माणगाव 

    दाखणें गावासह अनेक गावांना जोडणारा दाखणें गावाजवळील पूल गेली अनेक दिवस खचत चालला असून त्याची पडझड सुरु असून हा पूर्ण खचला असून तो कधीही कोसळेल याचा अंदाज करता येत नाही मात्र ह्या पुलावरून विदयार्थी, नागरिक मोठया संख्येने दररोज ये जा करतात त्यमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्षच चालविले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा पूल तत्काळ नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी ही नागरिक करीत आहेत.माणगाव तालुक्यातील महत्वाचा दाखणें, कालवण, मुंढेवाडी तसेच आदिवासी व बौध्दवाड्यांना माणगाव व इंदापूर बाजारासाठी तसेच विदयालय, महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी हा पूल सततचा  वर्दळीचा असून तो महत्वाचा आहे. हा पूल अनेक वर्षापूर्वी उभारला होता. त्या पुलाची दिवसेंदिवस पडझड सुरूच असून पूर्ण सिमेंट प्लास्टर गळून पडले आहे. त्यामुळे लोखंडी सळई गज उघडे पडले आहेत.

    तसेच पुलावरील रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असून एखादे वाहन गेल्यास त्या खड्यातच गाडी अडकून पुलात पडेल किंवा पूल कोसळून मोठी जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरीकातून बोलताना व्यक्त होत आहे.या मार्गावरून पादचारी, टू व्हीलर, मारुती कार, मोठी वाहणें ही सतत प्रवास करीत असतात. तसेच विदयार्थी, शिक्षक तसेच महिला, वृद्ध नागरिक ही मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवास करतात त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पुलासाठी दाखणें, कालवण, मुंढेवाडी तसेच आदिवासी व बौध्दवाड्यांतील ग्रामस्थांनी शासनाकडे या पुलाच्या नुतनीकरनाची मागणी लावून धरली होती. या पुलाची पाहणी विधान परिषदेचे आ. अनिकेत तटकरे यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ सबंधित अधिकाऱ्यांना हा पुल नव्याने बांधण्यासाठी योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या.

    दाखणें विभाग हा महाड विधान सभा मतदार संघात येतो. तेथील आ. भरत गोगावले यांनाही नागरिकांनी पूल बांधण्यासाठी निवेदन दिले होते . नागरिकांनी पुलाची शासनाकडे मागणी केल्या नंतर शासनाकडून या पुलाची काही वर्षापूर्वी  थोडी फार डागडुजी करण्यात आली होती. मात्र आजही या पुलाचा नागरिकांना धोका कायम आहे. कारण हा अनेक वर्षाचा पूल पूर्णतः मोडकळीस आला असून तो नव्यानेच बांधणे गरजेचे आहे.या पुलाला आमदारांचा फंड कमी पडतो त्यासाठी नाबार्ड योजनेतून 1 कोटी 40लाख खर्च येईल असे अंदाजपत्रक 3 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने केले होते. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता. तसेच दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या पुलाचे मोजणी व सर्वे केला जातो. तसेच पुलावर पावसाळ्यात पाणी वाहते त्यामुळे प्रवाशी वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही त्याचाही धोका आहे. या भागातील सुमारे 2000 लोकसंख्या असून हा पूल नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे.

अवश्य वाचा