पोलादपुर -

   तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन- तीन वर्षातील धान पीक नुकसान भरपाईची लक्कम प्रशासनाकडून तहसील कार्यालयाद्वारे थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू असताना तालुक्यातील शेतकऱ्यांकडून याबाबत प्रचंड निरुत्साह दर्शविला जात आहे. त्यामुळे पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने त्यांचे बँक खाते क्रमांक आणि सहमती पत्र स्थानिक तलाठी सजेमध्ये अथवा तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे.पोलादपूर तालुक्यांमध्ये 2017-18 या वर्षासाठी धान पीक नुकसान भरपाईसाठी सुमारे 32 लाख रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे.

   तालुक्यातील खातेदार शेतकरी यांच्या भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येऊन शासनाला अहवाल पाठवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुमारे 32 लाख रुपये अनुदानाची रक्कम पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होत आहे. आतापर्यंत हे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले असून तब्बल 16 लाख 50 हजारांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे, अशी माहिती तहसिलदार दिप्ती देसाई यांनी दिली आहे.या कामाला गती प्राप्त होण्यासाठी तालुक्यातील पंचनामे झालेल्या भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक तसेच सामायिक शेती असल्यास सहमती पत्र स्थानिक तलाठी कार्यालय अथवा पोलादपूर तहसील कार्यालय यांच्याकडे त्वरित सादर करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी केले आहे.पोलादपूर तालुक्यात यंदा झालेल्या भात पीक नुकसानीसंदर्भातील पंचनामे तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू असून याकामी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक तसेच तलाठी यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे तहसीलदार दिप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

   दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हे सामायिक शेती करत असून काही खातेदार व त्यांचे सहयोगी नातेवाईक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, ठाणे, पिंपरी चिंचवड व अन्य शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने भात शेती नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यास ते गावाकडे येत नाहीत. यामुळे अद्याप 2017-18 सालातील सुमारे 50 टक्के नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात विलंब झालेला दिसून येत आहे.पोलादपुर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील विविध भागांमध्ये भात शेतीच्या अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी बियाणं, मजुरी, खत, कीटकनाशक, मशागत, लावणी, कापणी, झोडणी, मळणी झाल्यानंतर हाती येणारे भात पीकभात भरडाईसाठी गिरणीकडे घेऊन जातो. सर्व काळात पैसा व श्रम यांची गुंतवणूक भातशेतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना याव्यतिरिक्त पीक विमा योजनेमध्ये सुध्दा आर्थिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

   शेतकरी त्यांचे भात पीक सरकारमान्य हमीभाव भात खरेदी केंद्रामध्ये तसेच खाजगी भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे विकून येत असतो. मात्र, शेतापासून हमीभाव भात खरेदी केंद्रामध्ये भाताची वाहतूक करण्याऐवजी गावांमध्येच भात खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना क्विंटलमागे दोन तीनशे रुपये भाव कमी घेऊन भात विकणाऱ्या शेतकऱ्यांचा भात आता केवळ पावसावरचा जुगार ठरला आहे. अशातच, आता भातशेतीची नुकसान भरपाई घेण्याची आवश्यक कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी देखील शहराकडे शेतर्कयांच्या खात्यावरचे वारस जर चाकरमानी असल्यास त्यांच्याकडून अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेसाठी गावाकडे येण्यास निरुत्साह दाखवला जात आहे. त्यामुळेच पोलादपूर तहसील कार्यालयात शासनाकडून जमा होणारे भात पीक नुकसान भरपाईचे अनुदान दरवर्षी शेतकऱ्यांना वाटपाविना पडून राहत असल्याचे समजून येत आहे.

अवश्य वाचा