नायगाव, मुंबई

   मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०१९.अमर संदेश, जय ब्राह्मणदेव, सूर्यकांत, बालवीर, शिवशक्ती, वारसलेन यांची विजयी सलामी.मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात अमर संदेश स्पोर्ट्स क्लब, जय ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ, सूर्यकांत व्यायाम शाळा, बालवीर क्रीडा मंडळ, शिवशक्ती क्रीडा मंडळ, वारसलेन क्रीडा मंडळ यांनी विजयी सलामी दिली. पावसाच्या प्रदीर्घ व्यत्ययानंतर आज अखेर या स्पर्धेला प्रारंभ झाला. वडाळा – मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या पहिल्या सामन्यात अमर संदेशने १४-१७ अशा मध्यांतरातील  पिछाडी नंतर ओम त्रिशूळ संघाचे कडवे आव्हान ३५-३० असे परतवून लावत आगेकूच केली. करणं रावत, अभिषेक पाल यांच्या चढाई – पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

   जयेश भोगले, वैभव शिंदे यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात राखता आला नाही.याच गटात जय ब्राम्हणदेवने एकता संघाला १७-१२ असे नमवित दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला ११-०६ अशी आघाडी असणाऱ्या ब्राम्हणदेवने हा फरक कायम राखत विजय साकारला. अमित कळंबे, कल्पेश तांडेल ब्राह्मणदेवकडून, तर भावेश सातार्डेकर, अभिषेक देसाई एकताकडून छान खेळले. सूर्यकांतने बलाढ्य अशा अमरहिंदला ३२-३० असे चकवीत पुढची फेरी गाठली. मध्यांतराला १५-०९अशी आघाडी घेणाऱ्या सुर्यकांतला मध्यांतरानंतर मात्र दीप थरवल, सिद्धेश सावर्डेकर, आदित्य पोफळणाकर यांनी चांगलेच झुंजविले. पण विजय काय ते मिळवू शकले नाही. सुर्यकांतच्या या विजयात मंदार ठोंबरेच्या चढाया आणि अनिकेत पवार, विपुल घारे यांचा भक्कम बचाव महत्वाचा ठरला. बालवीरने महालक्ष्मीला ४०-३२ असे पराभूत केले.  विश्रांतीला २०-१५ अशी आघाडी बालवीरकडे होती. दिशान डांगे, साई साटम, मनीष पड्यार या विजयाचे शिल्पकार ठरले. वैभव नाईक, सन्मित्र मांजरेकर यांनी महालक्ष्मीकडून कडवी लढत दिली. शिवशक्तीने दुर्गामाता बालमित्राचा कडवा प्रतिकार ३४-३० असा संपुष्टात आणला.

   तेजस पांढरे, शुभम यांनी पहिल्या डावात दुर्गामाताला १७-१६ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. दुसऱ्या डावात मात्र शिवशक्तीच्या आशिष शेंडे, निलेश सणस यांनी टॉप गिअर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला. वारसलेनने महेश मंडळाचा २४-१७असा पाडाव करीत आगेकूच केली. सोहम नार्वेकर, अक्षय वरळीकर वारसलेनकडून, तर नितीन यादव, प्रणय मोरे यांनी महेश मंडळाकडून उत्तम खेळ केला.कुमार गटाचे इतर संक्षिप्त (पहिली फेरी) :-  १)खडा हनुमान क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध ज्ञान प्रकाश क्रीडा मंडळ (४५-२१); २)चॅलेंजर बॉईज स्पोर्ट्स वि वि नवं बालक क्रीडा मंडळ (४०-१७); ३)अमर क्रीडा मंडळ वि वि संस्कृती प्रतिष्ठान (६०-२८); ४)पिंपळेश्वर क्रीडा मंडळ वि वि न्यू परशुराम बॉईज (६२-२०).
    

अवश्य वाचा