अलिबाग, 

   लोकमान्यनगर शिक्षण मंडळ संचलित आर.जे. ठाकूर कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबीर अलिबाग तालुक्यातील आगरसुरे येथे १ ते ७ नोव्हेंबर असे सात दिवस आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ५१ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य, रुढी, परंपरा या विषयी माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यातून त्यांचे व्यक्तीमत्व विकसित व्हावे यासाठी आर.जे. ठाकूर कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मांडवा लायन्स क्लब यांच्या सहकार्याने, मांडवा लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सुबोध राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

   या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत आगरसुरेच्या सरपंच जागृती पेडवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन करण्यात आले. याप्रसंगी लोकमान्य नगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मंगेश ठाकूर, सुबोध राऊत, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष विजयराव देशमुख, खजिनदार जितेंद्र ठाकूर, अमीष शिरगावकर, प्राचार्य रक्षा माहिमकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एनएसएस मुंबई विद्यापीठ समन्वयक प्रा. सुधीर पुराणिक यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला तसेच प्रा. धनंजय पष्टे (प्राचार्य मुंब्रा महाविद्यालय) यांनी देखील शिबिरास भेट दिली. या सात दिवसीय शिबिरात एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा. अस्मिता कांबळे, प्रा. गणेश गायकवाड, प्रा. गौरव पासी, किरण पष्टे व प्रा. बाळकृष्ण ठाकूर उपस्थित होते.या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी आगरसुरे गावाचा परिसर स्वच्छ केला. तसेच या गावात पथनाट्याद्वारे प्लास्टिक व व्यसनमुक्ती जनजागृती करण्यात आली. गावात लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कनकेश्वर येथे पाणी जिरवा पाणी अडवा अंतर्गत खड्डे करणे व स्वच्छता हा उपक्रम राबविण्यात आला. किहीम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.

   बांधण-पोयनाड येथील संपर्क बालग्राम या अनाथाश्रमास भेट देऊन तेथील मुला-मुलींना स्कूलबॅग्ज, वह्या व गोष्टीची पुस्तके दिली. बामणसुरे आदिवासी पाडा येथे भेट देऊन तेथील मुलांना शालेय साहित्य, खाऊ व कपड्यांचे वाटप केले तसेच प्लास्टिक जनजागृती विषयक पथनाट्य सादर केले.तसेच या शिबिरात जिल्हा वाहतुक शाखेचे निरीक्षक सुरेश वराडे यांचे "वाहतूक नियम", सतीश पाटील यांचे कराटे प्रशिक्षण व "सुंदर आरोग्य, सुंदर जीवन", प्रा संभाजी शेळके यांचे" सकारात्मक दृष्टिकोन", संदीप लबडे यांचे "अभिनय संधी" व्याख्यान व कार्यशाळा, प्राचार्य रक्षा माहिमकर यांचे "स्वयंसहाय्यता गट व व्यक्तिमत्त्व विकास" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अवश्य वाचा