नेरळ

   मध्य रेल्वेच्या कर्जत एन्ड कडील शेलू या उपनगरीय रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत.मात्र त्या ठिकाणी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकात असलेल्या भिंती या वेगवेगळ्या रंगाने रंगवल्या आहेत.दरम्यान,त्या भिंतींमुळे स्थानकात रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले असून शेलू रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खुश आहेत.शेलू हे मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानकात त्या परिसरात वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे मागील काही वर्षात वाढत रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचे ठिकाण बनत आहे. त्याचवेळी 10 वर्षांपूर्वी या भागात एक अभियांत्रिकी महाविद्यालय आले आणि शेलू रेल्वे स्थानकातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.अभियांत्रिकी महाविद्यालय बरोबर त्या भागात मुंबई मधील मध्यमवर्गीय यांचा लोंढा सतत येत आहे.त्यामुळे देखील लोकसंख्येत वाढ होत असताना त्या रेल्वे स्थानकातून सकाळी मुंबई गाठणारे प्रवासी यांची संख्या देखील वाढत आहे.

   त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा वाढलेला महसूल लक्षात घेऊन प्रवास करणारे प्रवासी यांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून अनेक कामे सुरू आहेत.त्यात दोन पादचारी पूल,निवारा शेड या पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत.मात्र आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करावे म्हणून अभियंता होण्याची जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्थानकाचा रुक्ष वाटणारा परिसर आनंददायी बनविण्याचा निर्णय घेतला.स्थानक बंदिस्त करणाऱ्या भिंती या दगड भिंतीच्या असून त्यावर रेल्वे कडून कधीतरी रंगरंगोटी केली जाते.त्यात पान खाऊन पिचकारी सोडणारे प्रवासी यांची शेलू स्थानकात काही कमी नाही.त्यामुळे त्या दोन्ही बाजूच्या भिंती,पादचारी पुलाच्या भिंती आणि स्थानक प्रबंधक यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर यांच्या भिंती रुक्ष बनल्या होत्या.ही बाब या भागात अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांना रुचली नाही.

   त्यांनी मध्य रेल्वेच्या परवानगी ने स्थानकात असलेल्या भिंतींना अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या रंगांनी भिंती सजवल्या.त्यात भिंतींवर दगड कोरून त्यात रंग भरले,काही ठिकाणी फुले काढली तर काही ठिकाणी आकर्षक वाटतील अशी चित्रे काढली.त्यामुळे रुक्ष वाटणाऱ्या भिंती आकर्षक दिसू लागल्या असून त्या बोलक्या देखील बनल्या आहेत.शेलू रेल्वे स्थानकात झालेले बदल हे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनाचा परिणाम आहे.मात्र स्थानकात लोकल चुकली तरी बसून राहणारे प्रवासी कंटाळत नाहीत असे रंगीबेरंगी वातावरण शेलू स्थानकात निर्माण झाले आहे.तर थकून दमून आलेले प्रवासी देखील शेलू स्थानकात आपल्या घरी जाण्यासाठी येत असताना स्थानकात उतरताच आनंदी वातावरणामुळे आनंदी होतात.हा बदल प्रवाशांना आनंद देणारा ठरत असून मनोरंजन करणारा देखील ठरत आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.