बोर्ली

   सततचे वादळ व सीमा ओलांडून समुद्राचे किनाऱ्याला ध डकत असलेल्या लाटांमुळे दिवेआगर समुद्र किनाऱ्याची मोठया प्रमाणावर धूप होत असून किनारी असणारी सुरू, केतकी तसेच अन्य  झाडांची संपदा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दिवेआगर समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये केव्हा धडकेल याचा आता नेम राहिलेला नाही , दिवेआगर समुद्र किनारी मागील काही वर्ष पासून संरक्षक बंधारा बांधण्याची आता पर्यंत केवळ घोषणाच झाल्या असून प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक निधी केव्हा येणार व संरक्षक बंधारा केव्हा होणार याच प्रतिक्षेमध्ये सागरप्रेमी व दिवेआगर ग्रामस्थ आहेत. दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे . पश्चिमेला असणाऱ्या अरबी समुद्रा मूळे व गावाला नारळ सुपारीच्या लाभलेल्या सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण त्याच प्रमाणे मनमोहक किनाऱ्यामुळे  पर्यटक विक एन्ड व सुट्टी ची मौजमजा करण्यासाठी नेहमीच येत असतात.

   दिवेआगरला लाभलेला शांत निर्मळ समुद्र किनारा हि निसर्गाची जणू देणगीच आहे. परंतु याच समुद्र किनाऱ्याची समुद्राच्या लाटां मुळे होत असलेली धूप पाहता किनाऱ्यावर असणारे वन संपदा हळू हळू समुद्र गिळकृत करीत चालला आहे. समुद्रामध्ये होत असलेले भराव, सततची येणारी वादळे यामुळे भयंकर उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याला असणारी व समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी सुरु च्या झाडांची वनराई, केतकीच्या झाडांची वने त्याचप्रमाणे इतरही औषधी व म्हत्वाची झाडे लाटांच्या तडाख्याने नष्ट होत आहेत. यासाठी समुद्र किनारी अद्यापही कोणत्याही प्रकारे संरक्षक बंधारा नसल्याने हि धूप दिवसेंदिवस अधिक होत चालली आहे. दिवेआगरचा समुद्र किनारा सुमारे 3 किमी लांबीचा आहे त्याठिकाणी मोठा निधी खर्ची घालून उत्तम बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवशयक आहे असे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे.

   तत्कालीन खासदार व केंद्रीय मंत्री यांनी संरक्षक बंधाऱ्यासाठी 2 कोटीच्या निधीची घोषणा केली परंतु त्या घोषणेचे पुढे काय झाले याबाबत जनता अनभिद्न्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पूर्वी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील दिवेआगर येथील ह्याच संरक्षक बंधाऱ्यासाठी 2 कोटी रुपये खडकवासला पुणे येथील पत्तन संस्थे मार्फत पहिल्या टप्यासाठी मिळून देण्याची घोषणा केली आहे. दिवेआगर समर्थ पाखाडी बाजूचा भाग हा समुद्र किनाऱ्याला लागून असल्याने समुद्राची अशीच धूप होत राहिल्यास समुद्राचे पाणी मानवी वस्तीमध्ये घुसण्यास वेळ लागणार नाही.

   त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने किनाऱ्यावर बांधलेले वॉच टॉवर देखील लाटांच्या माऱ्याने जमीनदोस्त झाला आहे. लोखंडी असलेला हा वॉच टॉवर  आवश्यक असून लोखंडी ऐवजी मजबूत काँक्रीटीकरणाचा बांधण्याची मागणी होत आहे.दिवेआगर समुद्र किनारी  पर्यटनाच्या दृष्टीने सोयीस्कर धूप प्रतिबंधक किनारा बांधल्यास सोयीचे होईल अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

अवश्य वाचा