अलिबाग

   सोशल मिडिया स्वरूपी लाटेमध्ये जणु काही आपण सगळे इतके वाहून गेलो आहोत की आजमितीला पालक आपल्या मुलांना खूप अगोदर म्हणजे अगदी वयाच्या 6 महिन्यापासून मोबाईल हातात देतात. टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, कॉम्पुटर, गेम स्क्रीन(एक्स बॉक्स- प्ले स्टेशन) व लॅपटॉपच्या अती वापरामुळे जवळपास 18 ते 20 टक्के मुलांमध्ये दृष्टीदोष आढळत असल्याचे निरीक्षण पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.याविषयी अधिक माहिती देताना लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या  बालनेत्रविकार तज्ञ  डॉ मोनिका सामंत सांगतात, बदललेल्या जीवनशैलीसोबतच रोजच्या जेवणात झालेला पश्‍चिमात्य बदल व रोज कमीत कमी दोन ते तीन तास स्क्रीन गॅजेटचा वापर केल्यामुळे पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये चष्मा लावण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.

   वीस वर्षांपूर्वी काही जन्मजात दोष असल्यामुळे एका वर्गामध्ये एक ते दोन मुलांमध्ये चष्मा घालण्याचे प्रमाण दिसून येत होते ते आजच्या घडीला वाढून 5 ते 10 झाले आहे , आज 50 मुलांमध्ये  सरासरी 5 ते 8 मुलांना चष्मा लागतो म्हणजेच त्यांची दृष्टी कुमकुवत होत आहे. एका जागेवर बसून सलग एक ते दोन तास मोबाईल अथवा इतर गॅजेटवर वेळ घालविल्यामुळे त्याना मैदानी खेळ खेळण्याची इच्छा होत नाही कारण त्या दोन तासामध्ये त्यांचा मेंदू थकून जातो. स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे शाळकरी मुलांचा डोळ्यांचा आकार वाढतो तसेच डोळ्यातील बाह्य आवरण कमी पडते. डोळ्याचे स्नायू थकून जातात तसेच ते डोळे कोरडे हातात व ताण वाढल्यामुळे दृष्टीदोष निर्माण होतात. भारतातील वैद्यकीय अनुमानांनुसार अडीच वर्षापर्येंतच्या मुलांना मोबाईल हाताळायला देणे हीच मोठी चुकी आहे कारण छोट्या स्क्रीनवर चलचित्र सातत्याने पाहण्याइतकी त्यांच्या  डोळ्यांची वाढ झालेली नसते, असे असूनही भारतातातील पालक सर्रासपणे आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यास देतात.

   एक ते दोन तास टीव्ही म्हणजेच मोठी स्क्रीन लगेच थोड्या वेळाने मोबाईलवर गेम खेळणे  (छोटी स्क्रीन ) नंतर लॅपटॉप अथवा कॉम्पुटरचा वापर अशा विचित्र सवयींमुळे डोळ्यांवरील ताण वाढत जाऊन लहान वयामध्ये दृष्टीदोषांना सामोरे जावे लागते.जागतिक पातळीवर झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, खूप जास्त स्क्रीन टाईममुळेसुद्धा मुलांमध्ये अनेक मानसिक व शारीरिक  बदल घडत असतात, आजकाल नवीन  अँप्स तसेच विडिओ गेम यांची  रचना अशा प्रकारे होत चालली आहे की  मुलांमध्ये जास्तीत जास्त त्याविषयी आतुरता निर्माण व्हावी  कारण त्यावर त्यांची आर्थीक गणिते अवलंबून असतात  म्हणजेच त्याची चटक लागावी व एकदा का जर ती चटक अथवा व्यसन लागले  तर त्याच्यावर उपचार करणे हे दारूड्याकडून दारू सोडविण्यापेक्षा ही अवघड असल्याचे मत बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ  डॉ प्रतीक सुरंदशे यांनी व्यक्त केले. 

   संपूर्ण भारताचा विचार करता चार ते बारा वर्षे वयोगटातील मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण बारा ते पंधरा टक्के असून ते ग्रामीण भागामध्ये सहा टक्के आहे परंतु अती सुधारित शहरांमध्ये हे प्रमाण वीस टक्के असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. मोबाइल, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध आहेत, त्या वापरायलाच हव्यात परंतु याचा विपरीत परिणाम आपल्या मुलांवर होत असल्याची जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे व यासाठी सरकारी तसेच खाजगी शाळा, महाविद्यालये  पातळीवर जागरूकता  होताना दिसली पाहिजे.

अवश्य वाचा