अलिबाग

   ऑक्टोबर महिन्यात क्यार वादळामुळे झालेल्या अवेळी अतिवृष्टीने जिल्ह्यातील 22 हजार 677 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. 1 हजार 701 गावातील 67 हजार 051 शेतकर्‍यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने शेती नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून शासनाला अहवाल सादर केला आहे.क्यार आणि माहा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर अनेक भागात अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका भात शेतीला बसला. 8 हजार 872 हेक्टरवर कापणी नंतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर 13 हजार 805 हेक्टर वरील शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले.

   अलिबाग तालुक्यातील 55, पेण तालुक्यातील 140, मुरुड तालुक्यातील 70, पनवेल मधील 150, उरण मधील 48, खालापूर मधील 125, कर्जत मधील 186, माणगाव मधील 187, तळा मधील 61, रोहा तालुक्यातील 163, , सुधागड मधील 100, महाड मधील 183, म्हसळा  मधील 72, श्रीवर्धन मधील 74 तर पोलादपूर मधील 87 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.रोहा, माणगाव, सुधागड, पोलादपूर, पेण, कर्जत आणि खालापूर तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात 13 हजार 300 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात 22 हजार 677 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले. म्हणजेच खरीप हंगामात एकुण 36 हजार हून अधिक हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. महत्वाची बाब म्हणजे नुकसान झालेल्या 22 हजार 677 हेक्टर पैकी केवळ 259 हेक्टर क्षेत्रावरील शेतीलाच विम्याचे संरक्षण आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पुर्ण झाले असून शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या हाती काय पडणार हे मात्र अनिश्‍चित आहे.

अवश्य वाचा