अलिबाग

   जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णाच्या नातेवाईकांच्या पायाखालील वाळू सरकत आहे. रक्तासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताची टंचाई जाणवत असल्याने अनेक रूग्णांचे जीव धोक्याच्या छायेत आहेत. दररोज जेवढा रक्तपुरवठा अपेक्षित असतो तेवढेही रक्त उपलब्ध नसल्याने रूग्णालय प्रशासन आणि रूग्णांचे नातेवाईक दोघांचीही धावपळ उडताना दिसत आहे. सध्या पॉझेटीव्ह रक्तपिशव्यांची संख्या 46 तर निगेटिव्ह रक्तपिशव्यांची संख्या फक्त एकच असल्याची नोंद रक्तपेढी आहे. तर पीसीव्ही अंतर्गत 26 पॉझेटीव्ह आणि  अवघे 2 निगेटिव्ह शिल्लक आहेत. एकूण 75 पिशव्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.रक्तातील दोषामुळे निर्माण होणार्‍या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना याचा अधिक फटका बसतो. वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे या रुग्णांचे हिमोग्लोबीन झपाटयाने कमी होते. नागरिकांनी जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणे आवश्यक आहे.

   रक्तपेढ्यांनीदेखील शिबिर आयोजित करून साठा वाढविला पाहिजे. तरुणांनी आपल्या मित्रांसह रक्तदान केले, तर टंचाई कमी होण्यास मदत मिळू शकते. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी समोर यावे, असे आवाहन केले जात आहे.सण-उत्सव काळात रक्ताचा पुरवठा कमी होतो. दिवाळीत महाविद्यालये, कंपन्यांना सुटी असल्यामुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नाही. त्यामुळे या 15 ते 20 दिवसांत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत नाहीत. मात्र, यंदा दिवाळीनंतरही रक्तदान शिबिरे फारच कमी प्रमाणात आयोजित करण्यात आली. ‘या काळात रक्ताची आवक नसल्यामुळे असलेला साठा लवकर संपतो आणि रक्तपेढयांवर अधिक भार येतो. संपूर्ण रक्तसाठयानुसार सध्या ‘अ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 4, ब रक्तगटाच्या 2 बाटल्या, ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 34 तर ‘अब’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 6 बाटल्या उपलब्ध आहे. तसेच ‘अ’ निगेटिव्ह रक्तगटाचीच फक्त 1 पिशवी उपलब्ध आहे. ब ‘ओ’ ‘अब’ निगेटिव्ह रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नाही. तर रक्तविघटनासाठी लागणार्‍या पीसीव्ही मध्ये सध्या ‘अ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 5, ब रक्तगटाच्या 1 बाटल्या, ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 16 तर ‘अब’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या 4 बाटल्या उपलब्ध आहे. तसेच ‘बी आणि ओ’ निगेटिव्ह रक्तगटाचेच प्रत्येकी 1 युनीट उपलब्ध आहे.

   ‘ओ’ आणि ‘अब’ निगेटिव्ह रक्तगटाचे एकही युनीट उपलब्ध नाही. दरम्यान, रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ दिपक गोसावी यांनी केलेल्या आवाहनानुसार कच्छि भवन ट्रस्टने तातडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामुळे रक्तसाठयात थोडीफार वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या नोव्हेंबर महिन्यात 4 रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी रोहा तालुक्यातील मेढा, 21 नोव्हेंबर रोजी पोयनाड, 24  रोजी कोळगाव-मांडवा तर 26 रोजी जेएसएम कॉलेज येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.