बेळगाव,दि.१३-

   सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदाराविषयी निवाडा जाहीर केल्यावर बेळगाव जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे.बेळगाव जिल्ह्यात कागवाड,गोकाक आणि अथणी येथे पोटनिवडणूक होणार आहे.त्यामुळे गोकाकचे रमेश जारकीहोळी,अथणीचे महेश कुमठळ्ळी आणि कागवाडचे श्रीमंत पाटील यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अथणी मतदार संघातून मागील निवडणुकीत पराभूत झालेले विद्यमान उप मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणीचे तिकीट भाजप देणार असल्याची चर्चा सुरू आहे.कारण मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यात विधिमंडळाचा सदस्य होणे आवश्यक असते.

   तर महेश कुमठळ्ळी यांना विधानपरिषदेवर घेण्याची योजना आकार घेत आहे.गोककमध्ये रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात त्यांचे बंधू लखन जारकीहोळी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचे निश्चित आहे.त्यामुळे जारकीहोळी बंधुमधील गोकाकची लढत रंगतदार ठरणार आहे.रमेश जारकीहोळी हे यापूर्वी पाचवेळा गोकाकामधून निवडून आले आहेत.काँग्रेस आणि निजद सरकार खाली खेचण्यात रमेश जारकीहोळी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.पण नंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे चौदा आणि निजदच्या तीन आमदारांना अपात्र ठरवले होते.सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्रांना निवडणूक लढविण्यास बंदी अध्यक्षानी घातली होती.या निर्णया विरोधात अपात्र आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.न्यायालयाने अपात्र आमदारांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिली असली तरी त्यांना मंत्रीपद भूषवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.कागवाड मतदार संघातून अपात्र ठरलेले श्रीमंत पाटील हे स्वतः निवडणूक लढवणार आहेत.काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

अवश्य वाचा