विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत देऊनही राज्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकले नाही. आमचं ठरलंय म्हणत मतदारांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजप शिवसेनेत निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन मोठा वाद झाला.शिवसेनेने अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची केलेली मागणी भाजपने धुडकावली. हा वाद इतका विकोपाला गेला गेली ३० वर्ष अभेद्य असणारी शिवसेना भाजप युती संपुष्टात आली. जनतेने या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत दिले होते आपापसातील वाद एकत्र बसवून मिटवता  आले असते,पण या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या स्वार्थ व इगोमुळे ते शक्य झाले नाही. जनतेने सत्ता स्थापनेचा दिलेल्या जनादेशाचा  अवमान करीत हे दोन्ही पक्ष भांडत राहिले. निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी यांच्यातील संपले नाहीत उलट वाढत गेले परिणामी दोघांनाही सत्ता स्थापन करता आली नाही.

    विरोधी पक्षांकडे सत्ता स्थापने इतपत पुरेसे बहुमत नव्हते त्यामुळे ते सत्ता सथापन करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षाच नव्हती. तीन आठवडे उलटूनही कोणत्याच पक्षाकडे पुरेसे बहुमत नसल्याने अखेर राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.आता सर्वच पक्षातील नेते राष्ट्रपती राजवट दुर्दैवी आहे असे सांगत आहेत, पण याच नेत्यांच्या स्वार्थ आणि इगोमुळे आज राज्यावर राष्ट्रपती राजवटीची नामुष्की आली आहे. मतदारांनी स्पष्ट बहुमत देऊन सत्ता स्थापन करण्याचा जनादेश दिला होता पण नेत्यांच्या हेकेखोरपणा व अट्टहासामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.केवळ आणि  केवळ राजकीय पक्षांच्या हेकेखोरपणामुळेच राज्यात आज ही  अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज राज्यात आस्मानी संकटाने थैमान घातले आहे. गेली चार वर्ष कोरड्या दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र यावर्षी ओल्या दुष्काळात वाहून गेला. परतीच्या पावसाने राज्यावर मोठे संकट कोसळले आहे.अतिवृष्टीने राज्यातील लाखो हेक्टर पीक वाया गेले आहे.

    राज्यातील बळीराजाचे तीस ते शंभर टक्के इतके नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. आणि लंबलेल्या पावसाने रब्बी हंगामही पुढे ढकलला जात आहे.जर राज्यात लोकनियुक्त स्थिर सरकार असते तर बळीराजाला या महासंकटातून वाचवता आले असते. बळीराजाला या महासंकटातून वाचवण्यासाठी तरी राजकीय पक्ष आपापसांतील मतभेद विसरुन एकत्र येतील व सत्ता स्थापन करतील अशी जनतेची  अपेक्षा होती पण नेत्यांच्या स्वार्थ आणि इगोमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. राज्य संकटात असताना राज्याला स्थिर सरकार देण्याऐवजी राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या खाईत लोटणाऱ्या पक्षांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही.

अवश्य वाचा