१४ नोव्हेंबर हा 'बालदिन' म्हणून देशभरात साजरा केला जातो. मुलांच्या हक्काचा वर्षातील हा एकमेव दिवस असला,तरी आजच्या लहान मुलांची स्थिती पाहिल्यास त्यांचे बालपण कुठेतरी हरवत चालल्याचे लक्षात येते. विज्ञानाने जग प्रगतशील झाले असे म्हणतात; मात्र याच विज्ञानाने लाभलेल्या मोबाईल, इंटरनेट, व्हिडीओ गेम, केबल टीव्ही यांसारख्या साधनांनी मुलांना वेगळ्या जगात नेले. मित्र मैत्रिणींसोबत मैदानी खेळ खेळण्याच्या, पालकांशी गप्पा मारून आपले विचार प्रकट करण्याच्या वयात मुले मोबाईलच्या आभासी जगामध्ये रमताना दिसत आहेत. परिणामी बालवयातच मुलांना नेत्रविकार, मनोविकार जडू लागले आहेत. शाळा, ट्युशन, क्लासेस मधील अभ्यासाच्या ओझ्याने मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटू लागली आहे. मुलांचे भवितव्य घडवण्याच्या हेतूने नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडणारे आई बाबा मुलांना उमलत्या वयातच वेळ देत नसल्याने मुलांमधील त्यांच्याविषयीची प्रेम आणि आपुलकी कुठेतरी उणावू लागली आहे. गेल्या काही वर्षांत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे . या सर्वांचा परिणाम म्हणून कि काय बाल गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक चढू लागला आहे. बालमजूर प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला तरी आज कितीतरी किराणा मालाच्या दुकानांत, चहाच्या टपरीवर, उपहारगृहांमध्ये लहान मुले राबताना दिसतात. लोकल ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकूणच आज बालदिन हा केवळ एक इव्हेन्ट बनून राहिला आहे. ज्या दिवशी मुलांच्या या स्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसेल तोच खऱ्या अर्थाने बालदिन असेल. 

 

अवश्य वाचा