कर्जत – दि.13

          कर्जत तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली - देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते यंदा सुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर  ठेऊन नाचविली. नवसाल पावणाऱ्या या दैवताचे दर्शन कर्जत शहरातील भाविकांबरोबरच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने  घेतले.

          यंदा भैरवनाथ मंदिराचे बांधकाम सुरु असल्याने किरवली - देऊळवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात   नवसाला पावणाऱ्या व परिसराचे रक्षण करणाऱ्या श्री भैरवनाथाची यात्रा पहाटे साडेचार वाजता काकड आरतीने सुरु झाली. त्यानंतर परिसरातील श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळाचे संगीत भजन झाले. सायंकाळी चारच्या सुमारास डोलकाठीची पूजा करण्यात आली.

            परंपरेनुसार या डोलकाठीच्या टोकाला ढाक येथील चढण्या – उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुड ध्वज आणला आणि काठीच्या तुऱ्यावर बांधला. या डोलकाठीची पूजा ट्रस्ट चे अध्यक्ष किसन जैतु बडेकर यांच्या हस्ते करण्यात आली.  त्यानंतर डोलकाठीचा मोर पिसाऱ्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फुट उंचीची काठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन   बडेकर, बिपीन बडेकर, शत्रुघ्न बडेकर, विश्वनाथ बडेकर, प्रकाश तथा पप्पू बडेकर, विकास बडेकर, चिराग बडेकर, दिलीप सागर बडेकर, सुरेश बडेकर, सौरभ बडेकर आदींनी नाचवित नेली. ही वजनी डोलकाठी नाचविण्यासाठी ताकदीची गरज नसते तर अनुभवाची आवश्यकता असते.

            डोलकाठी नाचवीत नाचवीत देऊळवाडी, बोरवाडी, किरवली येथे नेण्यात आली. त्या पाठोपाठ श्री भैरवनाथाची पालखी ओंकार भजन मंडळ आसरोटी - खालापूर यांच्या भजनी संगीतासह मिरवणुकीने नेण्यात आली. प्रत्येक घरी पालखीत असलेल्या श्री भैरवनाथाच्या मूर्तीची मनोभावी आरती व पूजा करण्यात आली.

            दिवेलागणीच्या सुमारास सुवासिनींनी उकडलेल्या पिठाचे दिवे सुपातून उडविले. पूर्वी हे दिवे घेण्यासाठी एकच झुंबड असे. ते खाण्यात वेगळीच मजा येत होती परंतु कालानुरूप त्यात बदल झाला असून हल्ली उडविलेले दिवे उचलण्यासाठी मुले येत नाहीत. श्री भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होती. पुत्रप्राप्ती साठी केलेला नवस बालकांचा  गुळाची तुला करून करण्यात येत होता. नवजात बालकांना सुधा श्री भैरवनाथाच्या पायाशी ठेऊन दर्शन घेण्यासाठी सुद्धा गर्दी होती. एकंदरीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 

अवश्य वाचा