कर्जत - दि.13 

               'जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान आई - बापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे असे नाही. स्वतःचा धर्म पाळणे हीच देवाची पूजा. हल्ली ऐंशी टक्के कीर्तनकार मंडळी पन्नास टक्के आई व पन्नास टक्के बाबांवर कीर्तन देतात परंतु त्यांचे आई - बाप कोणत्या वृद्धाश्रमात आहेत ते त्यांनी आधी पाहावे. देव पाहू नका देव होण्याचा प्रयत्न करा. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आपल्याला ज्ञान आहे पण ते शाळेतल आहे. जेंव्हा मुले होती तेंव्हा शाळा नव्हत्या. आता गल्लीबोळात इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. दीड - दोन किलोमीटरवर इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज आहेत परंतु 'एक या दोन' अस असल्याने आता मुल कुठे आहेत.' असे अमूल्य मार्गदर्शन समाज प्रबोधक ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून येथे केले.

                कर्जत तालुक्यातील हलीवली येथील भैरवनाथ मंदिरा मधील काकड आरतीच्या सांगता सोहळ्या निमित्त विजय हांडे आणि उपसरपंच सारिका हांडे यांनी ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी हरिपाठ ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे आणि ह. भ. प. दत्तात्रेय श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ करण्यात आला. यावेळी रायगड भूषण बडेकर यांचा सत्कार इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

                शिवभोळा चक्रवर्ती..... या एकनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन सादर करतांना इंदुरीकर यांनी  'पंधरा वर्षापूर्वी मुलींची लग्न झाली की, दिल्या घरी तू सुखी रहा म्हणजे आता फक्त माहेरपणाचा संबंध असे. दिली तेथे मेली अस होत. एखाद दिवशी बाप मुलीकडे गेल्यास गुपचूप तिला पैसे देत असे तिच्याशी मोकळ्या मनाने बोलण्याचीही चोरी होती. आता काळ बदललाय मुलीच लग्न झालं की, एखादा महिना तेथे राहून बघ नाहीतर जावयांनाच इकडे घेऊन ये एखादी टपरी टाकून देऊ अस म्हणणाऱ्या आया तयार झाल्या आहेत. खर तर मुलींच्या संसाराच वाटोळ लावण्याचं काम आज - कालच्या आया करीत आहेत. दररोज फोन करून काही ना बाही शिकवीत असतात. हे थांबल पाहिजे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा सल्ला महिलांना देऊन त्यांनी 'महिलांच्या बाजूने कायदे आहेत. त्याचा गैरफायदा घेतला जातो.' याबद्दल अनेक उदाहरणे त्यांनी दिली. याप्रसंगी परिसरातील असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अवश्य वाचा