बोर्ली मांडला

वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे. हे आपण सर्वच जाणतो; परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व समजणे गरजेचे आहे. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल.असे प्रतिपादन मुरूड तालुक्यतील बोर्ली येथे वाचनालय  उदघाटनप्रसंगी माजी सैनिक जनार्दन डयला यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चोगले, नागपूर सीताबर्डी येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक मनोज भोईर, बोर्ली ग्राम पंचायत सदस्य जगीता कोटकर, गणेश कट,संतोष (बालम)वायरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.असे डयला यांनी सांगितले.

मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. असं कारण सांगितलं जातं. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.असे संतोष वायरे यांनी प्रास्तविक करताना सांगितले.

अवश्य वाचा