पनवेल

   पनवेल परिसरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाण्याकडून जेरबंद करण्यात आले असून एकूण 7,27,400 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने तर गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील घरफोडीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार प्रयत्नशील आहेत.

   त्यांच्या आदेशानुसार खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे प्रकार वाढत चालले असल्यामुळे परिमंडळ - २ चे उपायुक्त अशोक दुधे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि योगेश मोरे, गुन्हे विभागाचे पोनीस निरीक्षक धुळबा ढाकणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या आहेत त्या त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक बाबींचा तपास करून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, पोलीस हवा.अनिल पाटील, बाबाजी थोरात, पोना.दीपक डोंगरे, महेश कांबळे, पोशी.युवराज शिवगुंडे, दिगंबर सलगर, सचिन सलगर, अमोल कोळी आदीजनांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. यावेळी गुन्ह्यातील सराईत आरोपी सुरज जिलेदार सिंग (२५, सुरज, गुजरात मूळ रा.उत्तरप्रदेश) आणि रब्बान उर्फ इरफान कलीम शेख (३७,रा.मदनपुरा,मुंबई मूळ रा.झारखंड) येथे राहणारे असून मुंबईतील मदनपुरा भागात ते आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोउनि संदीप माने यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.

   त्यानुसार त्यांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतली. यावेळी त्यांच्याकडून २४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर १६० ग्रॅम वजनाचे चांदीचे अंदाजे ७ लाख २७ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे हस्तगत करण्यात आली. सादर आरोपींविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल असून याबाबत अधिक तपास पोउनि संदीप माने करीत आहेत.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.