पंढरपूर 

   हमाल म्हणून कामावर का घेतले नाही? याचा राग मनात धरून पंढरपूर येथील भाजीपाला विक्रेते अशोक भिमराव बाबर आणि भिमराव विठोबा बाबर रा. सरकारी गोडाऊन मागे पंढरपूर, यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये दोघांनी चाकूने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेले वृत्त असे की अशोक बाबर यांचा इंदिरा गांधी मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास संतोष अंकुश हुलवान व विठ्ठल अंकुश हुलवान दोघेही रा.

   गजानन महाराज मठा मागे पंढरपूर, यांनी अशोक बाबर यांना आम्हाला हमाल म्हणून कामाला का घेतले नाही? याचा जाब विचारत अशोक बाबर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला चाकूने वार केला तसेच अशोकचे वडील भीमराव बाबर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हातावर चाकूने हल्ला केला यामध्ये दोघेही बापलेक जखमी झाले आहेत. सदरची घटना पंढरपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अशोक बाबर यांनी संतोष हुलवान व विठ्ठल हुलवान यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार भा.द.वि कलम ३२३,३२६,५०४,५०६,३४ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलिस करीत आहेत.

अवश्य वाचा