कर्जत - दि.9

               मुंबई बरोबरच आपलं नात जिव्हाळ्याने जपलेल्या स्वर्गीय सरदार कुलवंतसिंग कोहली यांनी कथन केलेल्या प्रा. नितीन आरेकर यांनी शब्दांकित केलेल्या आणि राजहंस प्रकाशनाच्या 'ये है मुंबई मेरी जान या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

              मुंबईच्या ताज महल हॉटेलमधील क्रिस्टल सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. पी एस. पसरीचा, श्रीमती मोहिंदर कौर कोहली, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे, गिरीश कुबेर, लेखक प्रा. नितीन आरेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

             'ये है मुंबई मेरी जान ' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे पुस्तकाचे लेखक प्रा. आरेकर यांचा सन्मान करताना राज्यपालांनी राजशिष्टाचार आड न ठेवता स्वतः उठून आरेकरां जवळ जाऊन त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यावेळी राज्यपाल किती साधे आहेत याची प्रचिती उपस्थितांना आली. यावेळी प्रकाशक बोरसे यांनाही सन्मानित करण्यात आले.

             राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी , 'काही लोक आपली छाप सोडून जातात. त्यापैकी एक कुलवंतसिंग होते. प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत आलेल्या कोहली कुटुंबाने स्वतःचे स्थान निर्माण केले आणि मुंबईचा अविभाज्य भाग झाले. मुंबईत मोठे झालेले अनेक जण आहेत मात्र कुलवंतसिंग सिंग यांनी स्वतः बरोबर अनेकांच्या स्वप्नांना बळ दिले आणि याची जाण ठेऊन मुंबईकरांनी त्यांना प्रेम दिले.' अशा भावना व्यक्त केल्या. 

                   सुशीलकुमार शिंदे यांनी, 'कोहली आणि माझे ऋणानुबंध हे 1976 पासून आहेत. चंदेरी दुनिये मागील वास्तव कोहली यांनी जवळून पाहिले. अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. झगमटा पलीकडे असलेले अनेक कलाकारांचे, दिग्गजांचे आयुष्य कोहली यांनी 'ये है मुंबई मेरी जान ' च्या माध्यमातून मांडले आहेत. हे पुस्तक क्षणिक आनंदासाठी वाचण्याचे नाही तर जीवनमूल्य शिकवणारे आहे. ती मूल्ये कोहलींनी आत्मसात केली होती. अनेकांची आयुष्ये त्यांनी उभी केली मात्र ते कायम नम्र राहून माणसे जोडत राहिले. हे पुस्तक हिंदी व इंग्रजी भाषेत केल्यास अनेकांना त्याचा लाभ घेता येईल. अशी आणखी माणसे परमेश्वराने घडवावीत.' अशी विंनती त्यांनी परमेश्वराला केली.

           अमरदीपसिंग कोहली आणि गुरुबक्षसिंग कोहली यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. आरेकर यांनी सदरापासून ते पुस्तका पर्यंतचा प्रवास उलगडताना, 'कोहली यांच्या सारख्या दिलदार माणसाची भेट हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांच्याशी बोलताना खूप काही शिकायला मिळाले. त्यांचा या वयातला  वक्तशीरपणा आणि त्यांनी कथन केलेल्या आठवणी साकारताना वेगळाच अनुभव आला.' असे स्पष्ट केले.

              कुबेर यांनी आपल्या मनोगतात, कोहली यांच्या बरोबरील भेटीचा प्रीतम योगायोग सांगून त्यांनी 'माणसांना सामावून घेणारे, आपलेसे करणारे कुलवंतसिंग हे 'भारत' या संकल्पनेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांची भेट ही माझ्यासाठी आयुष्यातील संस्मरणीय संध्याकाळ होती.' असे सांगितले. डॉ. बोरसे आणि डॉ. पसरीचा यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन डॉ. समीरा गुजर - जोशी यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत करून सोहळ्यात 'जान' आणली.

             याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग, राज्याचे निवृत्त मुख्य सचिव उत्तम खोब्रागडे, माजी आमदार सुरेश लाड, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. सुनील पाटील, पद्मश्री मनोज जोशी, सुभाष आठल्ये, प्राचार्य डॉ. पद्मा देशमुख, विजय कलंत्री, चारणजीत कौर, अजित केरकर, दिलीप माजगावकर, किशोर कुलकर्णी,गणेश वैद्य, राजाभाऊ कोठारी, प्रवीण गांगल, पंकज ओसवाल, प्रभाकर करंजकर, दिलीप गडकरी, रंजन दातार, राहुल कुलकर्णी आदिं सह कोहली परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'