पोलादपूर (शैलेश पालकर)- तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये असलेल्या आड ते कुंभळवणे गावाच्या तीव्र वळण उतारावरील घाट रस्त्यावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक मिनिबस आंब्याच्या झाडावर धडकली आणि पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त दर्शन घेऊन परणारे 19 प्रवासी जखमी झाले आहेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या दिवाण खवटी गावातील 19 वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे निघाले असताना पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर या मार्गावरून आंबेनळी घाटातून त्यांची मिनीबस (क्र.एमएच 04 एफएक्स 1632) ही पोलादपूर तालुक्यातील आड कुंभळवणे गावादरम्यान तीव्र वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली.

 

या अपघातामध्ये सहादेव विठू साळवी, गंगाराम गणपत साळवी, शिवाजी शेलार, जयवंती गंगाराम साळवी, शेखर काशीराम कदम, महादेव तुकाराम साळवी, परशुराम बाळाराम कदम, देवजी गोपाळ साळवी, ड्रायव्हर नितेश सावंत, वसंत साळवी, प्रतिभा कदम, प्रणाली साळवी, शांता साळवी, प्रमिला साळवी, पार्वती साळवी, चंद्रभागा कदम रोहिणी काजारे, अनिता काजारे, तुकाराम काशिराम काजारे आधी 19 प्रवासी जखमी झाले. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तातडीने जखमींवर उपचार करण्यात येऊन यापैकी सहदेव साळवी, पार्वती साळवी, शांता साळवी, प्रतिभा कदम, आणि ड्रायव्हर नितेश सावंत यांना गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले.

 

पोलादपूर पोलीस ठाण्याचे एएसआय मिंडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत ग्रामीण रूग्णालयामध्ये जखमींच्या जाबजबान्या घेतल्या असून पुढील कारवाईच्या माहितीसाठी अलिबाग मुख्यालयामध्ये माहिती घेण्याचे आवाहन पोलादपूर पोलीसांनी केले आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'