आगरदांडा 

एक्स एन सी सी कॅडेट्स असोसिएशन  संघटना ही अलिबागमधील माजी एन सी सी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार झालेली एक उदयोन्मुख संघटना असून  गेली तीन वर्षे या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक तसेच वैद्यकीय उपक्रमांमुळे चांगलीच नावारूपाला आली असुन याच संस्थेद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी तसेच सैनिकी जीवनाशी ओळख करून उद्याचे जवान घडवण्याकरिता  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सदरचे शिबीर गरूडपाडा (बामणगाव) येथील दादा गार्डन हॉल येथे संपन्न झाले त्यात सातवी ते बारावी वर्गातील एकूण ६७ मुलामुलींनी सहभाग नोंदवला. सलग तीन वर्षे या शिबिराचे आयोजन करीत असून शिबिराचे स्वरूप अधिकाधिक व्यापक होत चालले आहे. 

या शिबिरात विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, व्यक्तिमत्व विकास, रायफल शूटिंग, ड्रिल, फॉर्मेशन, परेड, विविध मैदानी खेळ,ऑबस्टॅकल्स, रोप क्लाइम्बिंग, रॅपलिंग, गिर्यारोहण साहित्याची ओळख, संभाषण कला या आणि अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले. 

उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे  भारतीय सेनेचे निवृत्त कॅप्टन - उमेश वाणी , रायगड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी - पद्मश्री बैनाडे,भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट कमांडर - रंजन कुमार,निवृत्त पोलीस अधिकारी - रोहिदास दुसार,दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी -दर्शन मुकादम , सुनील सावंत ,बामणगाव हायस्कुलचे चेअरमन - संतोष पाटील , दादा गार्डन हॉलचे मालक - सदानंद कवळे , दयानंद कवळे,प्रसाद चौलकर,क्षितिज विचारे,प्रणित पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिबिरादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदर शिबिराला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी - पद्मश्री बैनाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या स्वतः एक्स कॅडेट असून एन सी सी बद्दल आत्मीयता असल्यानेच मी या शिबिराला भेट दिल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे तसेच आयोजकांचे कौतुक करून आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. 

भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट कमांडर - रंजन कुमार यांनी मार्गदर्शन करताना नौसेनेतील विविध संधी यावर विस्तृतपणे चर्चा केली. भारतीय नौसेना कसे कार्य करते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  निवृत्त पोलीस अधिकारी श्री रोहिदास दुसार यांनी वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा आदी, जीवनातील नीती मुल्य विषयावर मार्गदर्शन करतानाच मुलांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले.

 दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी - दर्शन        मुकादम यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या अतिशय प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा करून पोलीस तसेच सैन्य दलातील विविध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

 सुनील सावंत यांनी गेल (Gail) या कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना आग विझविण्यासाठीचे तंत्र तसेच साहित्य याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. 

गिर्यारोहक तसेच ७५ देशांत सोलो सायकलिंग करण्यास सज्ज असलेले - क्षितिज विचारे यांनी विद्यार्थ्यांना गिर्यारोहण क्षेत्राची ओळख करून दिली तसेच त्यासाठी लागणारे साहित्याची माहिती करून देऊन काही प्रात्यक्षिके दिली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पदक विजेते कराटेपट्टू - प्रसाद चौलकर यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देऊन विशेषतः मुलींना निर्भीड आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले. 

येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून एकतरी विद्यार्थी सैन्य दलात रुजू होऊन देशसेवा करेल या उद्देशाने संस्था कार्य करीत असून या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करणे हा याच उद्देशाचा एक भाग असल्याचे संस्थेचे अध्यक्ष - प्रणित पाटील यांनी सांगितले. 

 येणाऱ्या काळात जास्तीत जास्त मुलामुलींना सैन्य दलात जाण्यास प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास घडवून एक आदर्श पिढी घडवण्याच्या भावनेतून राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून सामाजिक उपक्रम राबवण्याचा विचार मनात आला असे मत - हेमचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. 

 गणेश महाले, अविनाश म्हात्रे, राजेश भगत, सचिन शिंदे, प्रवीण धोत्रे, जयेश टोळकर, सुबोध पाटील, चैतन्य पाटील, प्रणित पाटील, सचिन गुरव, अमित कडू, रितेश म्हात्रे, कल्पेश वैद्य, अमोल ठाकूर, अरुण पाटील, मदन घरत, संतोष मुळम, दत्ता थळे, प्रसाद थळे आदी संस्थेच्या सदस्यांनी तसेच पदाधिकार्यांनी प्रचंड मेहनतीने सदरचे पाच दिवसांचे शिबीर यशस्वी केले. 

शिबिरात सतत पाच दिवस स्वयंशिस्त राखत, अथक शारीरिक परिश्रम केल्यानंतरही शेवटच्या दिवशी अतिशय जड अंतःकरणाने विद्यार्थ्यांनी शिबिराची रजा घेतली आणि उद्या पासून आम्ही पुढच्या वर्षीच्या शिबिराची वाट पाहू आणि शिबीरात शिकलेली नीतिमूल्ये, शिस्त, नम्रता इत्यादी गुण आम्हाला पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करणार आहेत असे मत व्यक्त केले. 

पालकांनी संस्थेचे आभार मानून पुन्हा पुन्हा असे शिबीर राबवण्यासाठी विनंती केली.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'