उरण

    गव्हाण फाटा - दिघोडे या रहदारीच्या रस्त्यावर अवजड कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक बेदरकारपणे होत असल्याने मोठया अपघातांची शक्यता बळावली आहे. पर्यायाने या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वी प्रमाणेच गतिरोघक बनवावे अशी मागणी भाजपचे युवानेते व वेश्वि ग्रामपंचायतचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली आहे.

      गव्हाण फाटा - दिघोडे मार्गावर मोठ्या प्रमाणात कंटेनर्स गोदामे निर्माण झाली आहेत.त्या ठिकाणी येणारे अवजड कंटेनर टेलर्सची सतत मोठी वर्दळ सुरू असते. नव्याने निर्माण झालेल्या या मार्गाचे नूतनीकरण करतांना कंत्राटदाराने एकही गतिरोघक न ठेवल्याने कंटेनर ट्रेलर्स चालक वाहनांची बेदरकारपणे वाहतूक करत असतात त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या जांभूळ पाडा, वेश्वि, दिघोडे या गावातील नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे.

            विशेष म्हणजे वेश्वि प्राथमिक शाळा याच रस्त्यालगत असून तेथेही गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचे जीवन रामभरोसे झाले आहे.परिणामतः सदर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर गतिरोघक निर्माण करून जनतेच्या जीवाची सुरक्षा करावी अशी आग्रही मागणी भाजपा युवानेते बेश्वि गावचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली आहे.

अवश्य वाचा