कर्जत- दि.8 

           लोहमार्ग पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी पोलिस स्थानकात वर्षानुवर्षे जमा असलेला मुद्देमाल जसे, सोने, मोबाईल, रोख रक्कम ज्या ज्या प्रवाशांचा असेल त्या त्या प्रवाशांना कायदेशीर पुर्तता करुन देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्यामुळे कर्जत रेल्वे जिआरपी यांनी सदर बाबतची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. त्यानुसार कित्येक वर्षांपासुन कर्जत जिआरपींकडे जमा असलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना सोपविण्यात आला. 

              आत्तापर्यंत सुमारे शंभरच्या वर प्रवाशांना त्यांचा चोरीस गेलेला ऐवज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जावुन परत करण्यात आला. अशीच एक चोरीची घटना दि.31 सप्टेंबर 1989 साली घडलेली होती. शेलु येथील महिला तारामती हरिचंद्र मसणे आपल्या तीन मुलांसह लोकलने प्रवास करत असतांना त्यांच्या आठ वर्षीय मुलाची सोन्याची चैन गाडीतुन उतरत असताना एका चोर महिलेने हिसकावुन पळ काढला सदर बाब लक्षात आली असता तारामती मसणे यांनी तात्काळ रेल्वे जिआरपींकडे तक्रार केली. कायदेशीर पुर्तता होईपर्यंत बराचसा वेळ निघुन गेल्याने तारामती मसणे यांनी चोरीला गेलेली सोन्याची चैन पुन्हा मिळेल याची आशा सोडुन दिली होती. परंतु, रेल्वे जिआरपी पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे चोरीची चैन फिर्यादी महिलेस परत करण्याकामी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जिआरपीचे पाटील व स्वप्निल मसणे यांनी कायदेशीर तपास पुर्ण करुन सुमारे तीस वर्षांपुर्वी चोरीस गेलेली सोन्याची चैन शेलु येथील रहिवासी तारामती मसणे यांना सुपूर्द केली. त्यामुळे इतक्या वर्षांनी चोरीस गेलेली मुलाची सोन्याची चैन पुन्हा मिळाल्याने त्यांनी कर्जत जिआरपी व रेल्वे पोलिसांचे मनःपुर्वक आभार व धन्यवाद मानले आहेत.

अवश्य वाचा