पनवेल, दि.7

कळंबोली वसाहतीमधील साईनगर सोसायटीमध्ये निष्पाप लहान मुलीला चिरडल्या प्रकरणी पीडित लहान मुलीच्या वडिलांकडून कोणतीही तक्रार दाखल न झाल्यामुळे अखेर कळंबोली पोलिसांकडून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले आहे. मुलीला गाडीने चिरडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्याने जनभावना तीव्र उमटत होत्या व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.

कळंबोलीतील साईनगर सोसायटीमध्ये पाच नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता सोसायटीच्या आवारात कार घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सुसाट सोसायटीमध्ये घुसली. त्याच वेळी सोसायटीमधून बाहेर जाणारी एक नऊ वर्षाची मुलगी वेगात जाणार्‍या गाडीने चिरडून गंभीर जखमी झाली. यामध्ये मुलीच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाली. जखमी झालेली मुलगी साक्षी सिंग असून ज्याने बेदरकारपणे गाडी चालवली त्याने जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे याबाबतची वाच्यता कुठेही झाली नाही. मात्र सहा तारखेला मुलीला गाडीने चिरडण्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर पसरल्याने जनभावना चांगलीच तीव्र झाली व मुलीला चिरडणार्‍या चालकाला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. मुलीला गाडीने चिरडणारा इसम हा उरणमधील एक शिक्षक असल्याचे समजते. मुलीच्या उपचाराचा खर्च आरोपी करणार असल्याने झालेल्या गुन्ह्याची पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ पसरल्याने अखेर कळंबोली पोलिसांनी सदर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला लवकरच गजाआड केले जाणार असल्याचे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले आहे. जखमी मुलगी कामोठ्याच्या एमजीएम हॉस्पिटमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

अवश्य वाचा