पनवेल 

            जून महिन्यापासून सुरु झालेला पावसाळा थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे आणि विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र झोडपून काढला. या पार्शवभूमीवर पनवेल तालुकाही त्याला अपवाद ठरला नाही. संपूर्ण पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्धवस्त होऊन आत्तापर्यंत जवळपास 3564 भातशेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच यावेळी अजूनही भातशेतीच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. भर पावसाळ्यात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना दुर्दैवी अंताला सामोरे जावे लागले आहे यापैकी 5 जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली गेली आहे. 

             पनवेल तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच पुन्हा नव्या उमेदीने जीवनाचा पसारा आटोपत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. पनवेल तालुक्यात 136 घरांची अंशतः पडझड झाली असून पूर्ण पडझड झालेल्या घरांची संख्या 23 इतकी झाली आहे. तसेच बाधित झालेल्या गोठ्यांची संख्याही 14 इतकी झाली आहे. तर एका झोपडीचा समावेश पूर्णतः नष्ट झालेल्यामध्ये आहे. या संपूर्ण पावसाळ्यात अतुवृष्टीमध्ये वाहून जाण्यासह झाड अंगावर पडून मयत झालेल्या अशा तब्बल 10 जणांचा नैसर्गिक आपत्तीमध्ये अंत झाला होता, यातील उमरोली येथील दाम्पत्य वाहून गेले होते तसेच माणगाव येथील इसम पनवेल येथे आला असता त्याच्या विचुंबे येथे डोक्यात झाड पडून त्यांचा अंत झाला होता. यासह उसर्ली येथील आणि पनवेलमधील दोघांना नैसर्गिक आपत्तीमध्ये आपला जीव गमवावा लागला. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत केली असल्याची माहिती पनवेल तहसील कार्यालयामार्फत उपलब्ध झाली आहे. संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजविल्यानंतर परतीच्या पावसानेही पनवेलला झोडपले. मात्र एवढ्यावरच न थांबता ऐन नोव्हेंबर महिन्यात पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे अवकाळी पावसाचा फटका देखील शेतकऱ्यांना बसला आहे, त्यामुळे सध्या जरी साडेतीन हजार भातशेतीचे नुकसानीचे पंचनामे तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले असले तरी अजूनही अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेले शेतकऱ्यांच्या भातशेतींबाबत पंचनामे सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

अवश्य वाचा