खेड 

     तालुक्यातील दिवाण-खवटी सातपाने वाडी येथील तरूणांनी आबाल-वृध्दांना हाताशी घेत वाडीतील पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत श्रमदान करून शोधून काढला.  श्रमदान  करून खोदण्यात आलेल्या ठिकाणी पाण्याचा मोठया प्रमाणात साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे महिलांच्या चेह-यावर हास्य उमलले.

     खेड तालुक्यात दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधित पाणी टंचाईचे भीषण सावट कायम असते. सहयाद्रिच्या द-या-खो-यात वसलेल्या गाव-वाडयांना पाणीटंचाईची झळ बसतच असते. मात्र शासकीय मदतीची कोणतीही वाट न पाहता तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या दिवाण-खवटी सातपाने वाडीतील ग्रामस्थांनी आपली तहान भागविण्यासाठी श्रमदान करत  पाण्याचा शोध घेतला.

दरवर्षी खेड तालुक्यात सरासरीपेक्षा मोठया प्रमाणात पाऊस पडत असतो मात्र  तालुका दरवर्षी तहानलेलाच राहतो.

     मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या दिवाण-खवटी सातपाने वाडी हि वाडी गेली अनेक वर्ष पाणी टंचाईशी सामना करत आहे. शासकिय योजना कार्यरत असताना देखील पाणी टंचाई येथील ग्रामस्थांच्या जणु काही पाचविलाच पुजलेली आहे. अशी स्थिती असताना टँकरद्वारे येथील तहानलेल्या ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. सुमारे ४० ते ४५ घरांची असलेली वाडी मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. पाणी टंचाईची प्रमुख समस्या सोडविण्यासाठी यावर्षी येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्षरित्या पुढाकार घेतला.

      रोजगार उपलब्ध नसल्याने या वाडीतील बहुतांशी लोक हे काम धंदयासाठी मुंबई आणि पुणे येथे स्थलांतरीत झाले आहेत. तरूणांनी आबाल-वृध्दांना हाताशी घेत दिवाळी निमित्त आलेल्या ग्रामस्थांनी या वाडीतील पाण्याचा उपलब्ध स्त्रोत शोधून त्या ठिकाणी श्रमदान केले अन् पाणी टंचाईवर मात करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला त्यांच्या प्रयत्नाना यश आले.

श्रमदान करून खोदण्यात आलेल्या ठिकाणी पाण्याचा मोठया प्रमाणात साठा उपलब्ध असून  हा साठा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

अवश्य वाचा