चिपळूण 

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चिपळुण, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन दिनांक २८ आणि २९ डिसेंबर २०१९ रोजी कोकणात चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मेहता पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख अनिल मेहता यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.

गेल्या वर्षीपासून या संमेलनाचा प्रारंभ झाला असून पहिले लेखक-प्रकाशक संमेलन पुस्तकांचे गाव भिलार-महाबळेश्वर येथे पार पडले. यंदा संमेलनाचे दुसरे वर्ष असून संमेलनाचे स्वागताध्यक्षपद कोकणातील नामवंत लेखक आणि कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे भूषविणार आहेत. या संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष कवी अरुण इंगवले असणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या संमेलनात 'प्रकाशकांच्या समस्या', 'ग्रंथविक्रीच्या नव्या वाटा-नव्या दिशा', 'प्रवास पुस्तक निर्मितीचा', 'व्यवसाया पलिकडचे लेखक-प्रकाशक स्नेहबंध' अशा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची प्रकट मुलाखत या संमेलनात होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची विशेष उपस्थिती संमेलनाला लाभणार आहे. 

या संमेलनाला महाराष्ट्रातील लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत