चिपळूण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने आयोजित ४ थ्या पर्यावरण संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी, कोकणासह राज्यभरातील बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, पुणे अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा जिल्ह्यातून आलेल्या पर्यावरणप्रेमी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाशिष्ठीची रम्य जलसफर अनुभवली. ‘डेस्टिनेशन चिपळूण’साठी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’करीत असलेल्या प्रयत्नांचे वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि सर्व पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले.

मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी, केरळच्या बॅकवॉटरचा कोकणात आनंद, रम्यखाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता सर्वांना अनुभवता आली. ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. खाडीतील नैसर्गिक वातावरणात सर्वांना मगर पाहाता आली. खाडीत पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी आणि काही दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही अनेकांना झाले. वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम, किल्ले गोविंदगड याचीही माहिती देण्यात आली. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता सर्वांना पाहाता आली.

यावेळी ग्लोबल चिपळूणचे चेअरमन श्रीराम रेडिज, वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, पर्यटन अभ्यासक आणि संमेलनाचे निमंत्रक धीरज वाटेकर, पर्यटनदूत समीर कोवळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पर्यावरणप्रेमींना  संस्थेच्या चार बोटींच्या माध्यमातून ही जलसफर घडविण्यात आली. याचे सफर नियोजन ग्लोबल चिपळूणचे व्यवस्थापक विश्वास पाटील यांनी केले.

अवश्य वाचा