चिपळूण 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने आयोजित ४ थ्या पर्यावरण संमेलनाच्या समारोपप्रसंगी, कोकणातील पर्यावरणाची वस्तुस्थिती समजून घेता आल्याच्या भावना राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, पुणे अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा जिल्ह्यातून आलेल्या पर्यावरणप्रेमी शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

संमेलनाचा समारोप काल (रविवारी) सायंकाळी एसआर. जंगल रिसॉर्ट धामणवणे येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि समारोप सत्राचे अध्यक्ष श्रीराम रेडिज, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, पुण्याच्या प्रा. अल्का गव्हाणे, सिंधुदूर्गच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे, मंडळाचे कणकवलीतील पर्यावरणप्रेमी  रणजित पाताडे, अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक, निवृत्त वनपाल सावंत, संमेलनाचे निमंत्रक धीरज वाटेकर उपस्थित होते. यावेळी प्रा. तारा काबरा, प्रा. अनिल लोखंडे, अॅड. सुभाष डांगे, कचरू चांभारे, गोरखनाथ शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे आणि रणजित पाताडे या दाम्पत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्यात मंडळाचे काम वाढविण्यासाठी जिल्ह्याध्यक्ष म्हणून आगामी काळात आपण निश्चित प्रयत्न करू, लोकजागृतीसाठी कार्यरत राहू अशा भावना यावेळी जबाबदारी देण्यात येऊन रणजित पाताडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाताडे दाम्पत्यानी व्यक्त केल्या. या संमेलनामुळे, राज्यातील पर्यावरण प्रेमींना, कोकणातील पर्यावरणाची समस्या समजून घेता आली. संमेलनातील वक्त्यांच्या उद्बोधक मार्गदर्शनामुळे पर्यावरण संवर्धन विषयात कोकणात सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती मिळाल्याच्या भावनाही व्यक्त झाल्या. स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज यांच्या उध्गातन सत्रातील परखड भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. प्रभाकर तावरे यांनी या प्रसंगी बोलताना, कचऱ्याच्या समस्येवर भाष्य केले. आगामी काळात जगबुडी ही कचऱ्याने होईल अशी स्थिती असल्याची व्यथा त्यांनी मांडली. आपल्या वापरातले प्लॅस्टिक बंद करा अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली. संमेलनाचे उद्घाटक सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे, नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. चिपळूणला पर्यावरण संमेलन घेतल्याबद्दल श्रीराम रेडिज यांनी मंडळाला धन्यवाद दिले. आबासाहेब मोरे यांनी बोलताना पर्यावरण संवर्धन विषयातील जाणीव जागृतीचा हा यज्ञ आपल्या सर्वांच्या पाठबळावर यशस्वी होत असल्याचे सांगून हे पाठबळ भविष्यात कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळच्या सत्रात पर्यावरणप्रेमींनी शहरातील ‘लोटिस्मा’च्या अश्मयुगकालीन आणि कोकणातील जुन्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या कोकणातील एकमेव वस्तूसंग्रहालयास भेट देऊन कोकणची संस्कृती समजावून घेतली. संग्रहालायाबाबत धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांनी सर्वांना माहिती दिली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या व्यवस्थापनात मंडळाचे सचिव प्रमोद मोरे यांनी मोलाचे योगदान दिले. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. आभार विलास महाडिक यांनी मानले.

अवश्य वाचा