जेएनपीटी दि ३

    उरण तालुक्यातील जनतेचे भातशेती हे एकमेव पीक आहे.परंतू भात पिकाची कापणी करण्याचा हंगाम संपत येत असताना ही परतीचा पाऊस नोव्हेंबर महिना उजाडल्या नंतरही थांबवण्याचा नाव घेत नसल्याने भातशेतीत साचलेल्या पाण्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करावे आणि या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी केली आहे.

     शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की उरण हा डोंगर आणि अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला तालूका आहे.या तालुक्यातील जनतेचे भातशेती हे एकमेव पीक आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर या पावसाच्या काळावधीत येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीत विविध जातींच्या भात पिकाचे उत्पादन घेत असतात,मात्र या वर्षी नोव्हेंबर महिना उजाडल्या नंतरही पाऊस लांबल्याने कापलेल्या भाताचे भारे भिजले असून नासाडी झालेली असताना शासनाचे अधिकारी,कर्मचारी आज पर्यंत भात पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतीकडे फिरकले नाहीत.

     एकंदरीत सतत वर्षभर शेतकरी राबून हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्यात भिजून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तरी शासनाने त्वरीत उरण तालुक्यातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नूकसान भरपाई द्यावी व उरण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उरण तालुक्यातील शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी केली आहे.

     उरण तालुक्यातील भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी,कुषी अधिकारी कर्मचारी यांना दिले आहेत.आणि ज्या शेतीचे या आधी पंचनामे झाले असतील त्या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे पंचनामे पुन्हा होणार नाहीत.तरी पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याना सहकार्य करावे असे आवाहन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी बोलताना केले आहे.

अवश्य वाचा