बेळगाव,दि.२

              स्मार्ट सिटी योजनेतील सुरू असलेल्या मंडोळी रोड रस्त्याच्या कामाने एक बळी घेतला आहे.शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून  मृत व्यक्तीचे नाव दौलत डवले (५१),सहावा क्रॉस द्वारकानगर असे आहे.दौलत हे प्रकाश थिएटरमध्ये कामाला होते.रात्री ते कामावरून घरी परतत होते त्यावेळी ते रस्त्या कडेला गटारीसाठी खणण्यात आलेल्या गटारीत पडले.त्यावेळी तेथे बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या आणि त्यांना प्राण गमवावे लागले.

                 दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून या रस्त्याचे काम सुरू असून कंत्राटदार देखील मनमानी पद्धतीने काम करत असल्याच्या तक्रारी तेथील लोकांनी केल्या आहेत.कंत्राटदाराने सध्या काम बंद ठेवले असून तेथील पथदीप देखील बंद आहेत.यापूर्वी देखील तेथे अपघात होऊन एकाला प्राण गमवावा लागला आहे.

             दौलत डवले यांच्या परिवाराने आणि नागरिकांनी स्मार्ट सिटी कार्यालया समोर धरणे धरले होते.या प्रकरणी ठळकवाडी पोलीस स्थानकात कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी योजनेतील अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर नियंत्रण नाही त्यामुळे रस्त्याची आणि अन्य कामे मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप मंडोळी रोडवरील नागरिकांनी केला आहे.

 

अवश्य वाचा