बेळगाव,दि.१

राष्ट्रवादी काँग्रेस सदैव सीमावासीयांच्या  पाठीशी आहे.आपण अत्याचाराला दाद न देता लढा चालू ठेवला हे कौतुकास्पद आहे.हा  प्रश्न तडीला लावल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही .सीमाबसियांचे प्रश्न,समस्या विधानसभेत नक्की मांडेन असे उदगार चंदगड, गडहिंग्लजचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर,प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते.

गाव,कारवार,निपाणी,बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी मराठी भाषिकांनी शहर दणाणून सोडले.सकाळी साडेनऊ वाजता निघालेल्या सायकल फेरीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते.दंडाला काळ्या फिती,हातात भगवे ध्वज,डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले होते.हातात विविध फलक देखील सायकल फेरीत सहभागी झालेल्यानी घेतले होते.सीमालढ्यासाठी एकत्र या,माझे बाबा समिती मी समिती असा फलक हातात धरलेल्या लहान मुलाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.समितीतील दोन गटांना एकत्र या असे आवाहन करणारा बॅनर तरुणांनी फेरीत प्रदर्शित केला होता.

सायकल फेरी कपिलेश्वर ब्रिजवर आल्यावर फेरीचे विराट दर्शन घडले.ब्रिजपासून शिवाजी उद्यानाच्या पुढेपर्यंत भगवे ध्वज हाती घेतलेला मराठी भाषिकांचा जनसागर पसरल्याचे दृश्य दिसत होते.अनेक लहान मुले शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पोशाख परिधान करून फेरीत सहभागी झाले होते.महिला देखील काळ्या साड्या परिधान करून सायकल फेरीत सहभागी झाल्या होत्या.मिरवणूक जशी पुढे जात होती तसा मराठी जनतेचा सहभाग वाढत गेला.युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण काळे पोशाख परिधान केले होते.फेरी मोठी असल्यामुळे अनेक ठिकाणी थांबावे लागत होते.सायकल फेरीच्या मार्गावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.पोलिसातर्फे देखील फेरीचे छायाचित्रण आणि चित्रीकरण करण्यात येत होते.

शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे यांनी मोबाईल वरून सभेच्या ठिकाणी जनतेशी संवाद साधला.शिवसेना तुमच्या सोबत आहे .तुम्हाला न्याय मिळेपर्यंत शिवसेना तुमच्या पाठीशी राहील.सिमावासीयांच्या भावना केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील.   सिमावासीयांच्या मागणीचा केंद्राकडे पाठपुरावा शिवसेना करेल.यापूर्वीही शिवसेना सिमावासीयांच्या पाठीशी होती,यापुढेही राहील असे उदगार मोबाईलवरून संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी काढले.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.