खांब-रोहे, दि१

       वातावरणातील वाढत चाललेली  उष्णता थांबण्याचे नाव घेत नसल्याने परतीचा पाऊस पुन्हा कोसळेल की काय अशाप्रकारची भिती वाटत असतानाच अखेर पावसावर भरवसा ठेऊन शेतकरी वर्गाने आपल्या शेतीचे कामास प्रारंभ करण्यात आला आहे. 

          आपला भारत देश मोसमी हवामानात मोडत असल्याने  परतीच्या पावसाचा धोका पावसाळी    भातशेतीला नेहमीच सोसावा लागत आहे.त्यामुळे दरवर्षी फार मोठ्या नुकसानीला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. तरी देखील आपला पिढीजात व्यवसाय व उत्पन्नाचे साधन म्हणून शेतकरी वर्ग पावसाळी भातशेतीवरच अवलंबून आहे.सद्यस्थितीत वाढती उष्णता पाहता परतीच्या पावसाचा धोका अद्याप टळला नसल्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात असल्याने प्रचंड ऑक्टोबर हिटची पर्वा न करता शेतकरी वर्गाने आपल्या कापणी,बांधणी व झोडणी च्या कामास प्रारंभ केला आहे.गेली पंधरा दिवस व ऐन दीपावली सणाच्या कालावधीत सक्रिय राहिलेला परतीचा पाऊस थांबल्याने अखेर शेतीच्या कामाने ठिकठिकाणी वेग घेतला असल्याचे दिसत आहे. या वर्षीच्या शेती हंगामात परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाचा चांगलाच अंत पाहिला.तयार भातशेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.त्यामुळे दीपावली सणत शेतकरी वर्गासमोर अंधारच राहिला. ऐन कापणी,बांधणी व झोडणीच्या हंगामात परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाची पुरती दशा केल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला.पदरात काहीच न पडल्याने आर्थिक विवंचणेत शेतकरीवर्ग सापडला आहे.

        नुकताच दीपावली सण संपला आहे.व परतीचा पाऊसही माघारी फिरला असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत उरले सुरले भातपिक पदरात पाडून घेण्याची एकच लगबग उडाली असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण परतीचा पाऊस माघारी फिरला असला तरी परत कधी सक्रीय होईल याचाही भरवसा नसल्याने जे शेतात उभे आहे ते आपले मानून आता पदरात पाडून घ्यायचे हाच उद्देश उरला आहे.निसर्गावर आधारित असलेली भातशेती आता पूर्णपणे बेभरवशाचीच राहिली आहे.कारण दरवर्षीशेती क्षेत्राला परतीच्या पावसाचा तडाखा बसत असल्याने आता मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच घाई दिसून येत आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'