बेळगाव,दि.३१

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुक्रवार दि.१ नोव्हेम्बर रोजी मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळण्याचे आवाहन केले आहे.काळ्या दिनानिमित्य काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.    सकाळी नऊ वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर  संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला प्रारंभ होणार आहे.शहरातील विविध मार्गावर फिरून सायकल फेरीची सांगता गोवावेस येथील मराठा मंदिर येथे होणार आहे.

सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ मराठी भाषिक एक नोव्हेम्बर कर्नाटक  राज्योत्सवदिनी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करत आहेत.भाषावार प्रांत रचनेच्यावेळी मराठी भाषिक बहुसंख्येने असूनही बेळगाव,कारवार,निपाणी,बिदर, भालकीसह भाग कर्नाटकात डांबण्यात आला.तेव्हापासून गेली ६३ वर्षे मराठी भाषिक आपल्यावर झालेल्या अन्याया विरोधात सनदशीर मार्गाने लढत देत आहेत.कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार केले तरी देखील मराठी भाषिकांची जिद्द आणि महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तसूभरही कमी झालेली नाही.

काळ्या दिनाच्या सायकल फेरीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागवार बैठका घेण्यात आल्या आहेत.खेडोपाडी देखील बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली शहर परिसरात आणि सोशल मीडियावर जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

शुक्रवारी शहरात राज्योत्सव मिरवणूक आणि समितीची काळ्या दिनाची सायकल फेरी निघणार असल्याने पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा