बेळगाव,दि.३०

            देशसेवा करण्यासाठी सैन्यात दाखल व्हायचे स्वप्न मनात बाळगून आलेल्या हजारो तरुणांना फुटपाथवर थंडीचा सामना करत रात्र काढावी लागली. बेळगावात बुधवार पासून सुरू झालेल्या सैन्य भरतीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कॅम्प मधील मिलिटरी स्कुलच्या मैदानावर झालेल्या सैन्य भरतीला दहा हजारहून अधिक तरुण उपस्थित होते.गर्दी प्रचंड झाल्यामुळे तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना  सौम्य लाठीमार देखील करावा लागला.

                नऊ नोव्हेम्बर पर्यंत सैन्य भरतीची प्रक्रिया चालणार आहे.बहुतेक तरुण परगावाहून आल्यामुळे त्यांनी कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या कडेला ,दुकानाच्या पायरीवर,मैदानात अशा ठिकाणी मुक्काम ठोकला.रेल्वेच्या समुदाय भवन मध्ये तरुणांची सोय करण्यात आली होती पण ती जागा खूप कमी पडली.सरदार हायस्कुलच्या मैदानावर देखील जिल्हा प्रशासनाने स्नानगृह आणि शौचालयाची व्यवस्था केली होती पण हे ठिकाण भरतीच्या ठिकाणापासून दूर असल्यामुळे तेथे कोण गेलेच नाहीत.

                 अंबा भुवन परिसर,बोगारवेस ,ग्लोब टॉकीज ,शौर्य चौक,राणीची बाग आणि अन्य भागात तरुणांनी घरून आणलेली शिदोरी खाऊन फुटपाथवरच आपली पथारी पसरली.थंडीचे दिवस आणि कुडकुडत झोपलेले तरुण पाहून अनेक स्वयंसेवी संस्थांनी काही जणांना जागा उपलब्ध करून दिली. कोनवाळ गल्ली बॉईज आणि श्री राम सेनेने आठ हजार तरुणांना चहा आणि बिस्किटे वितरित केली.बुधवारी महाराष्ट्रातील तरुण भरतीसाठी दाखल झाले होते.आता दररोज एका राज्यासाठी भरती प्रक्रिया असणार आहे.एकूण जागा चाळीस आहेत आणि भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या हजारोच्या घरात आहे.त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत लाखाहून अधिक तरुण भरती प्रक्रियेसाठी सहभागी होतील असा अंदाज आहे. भरतीसाठी हजारो तरुण आल्यामुळे कॅम्प भागातील अनेक रस्ते तरुणांनी फुलून गेले होते.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.