"आता आम्ही काय खायचं,म्हसळ्यातील शेतकऱयांच्या आर्त किंकाळ्या,भाताचे भारे पोहू लागले".

जून पासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने गोरगरीब शेतकऱयांना हैराण करून सोडले असताना ऑक्टोम्बर महिना संपत आला तरी पावसाने जराशीही उसंत घेतली नाही.मोठ्या कष्टाने पिकविलेली भातशेती,नाचणी,वरी, तीळ इत्यादी पिकांची साफ धूळधाण झाली असून आता आम्ही काय खायचं अश्या आर्त किंकाळ्या गावागावातून ऐकावयास मिळत आहेत.याचा सर्वात जास्त फटका पाणथळ शेती असणाऱ्या शेतकऱयांना बसला आहे.सरकार लवकरात लवकर पंचनामे करून जेवढ्या लवकर किमान २५०००/- रुपये एकरी भाव देईल तरच आम्ही थोडेफार सावरू शकतो अशी मागणी समस्त शेतकाऱयांकडून जोर धरत आहे.शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले असून कापून ठेवलेली शेतीला पुन्हा कोंब फुटल्याचे प्रकार संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळतात.परतीच्या पावसाने शेतकऱयांना हवालदिल केलं असून संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकाऱयांकडून होत आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्ण शेती पाण्यात आडवी झाल्याचे चित्र प्रत्येक गावागावातून दिसत आहे.निसर्गाच्या सततच्या बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला शेतकऱ्यानं नेहमीच सामोरे जावे लागत असल्याने भविष्यात शेती करावी कि नाही असा गंभीर प्रश्न शेतकाऱयांसमोर उभा आहे.तालुक्यातील तुरुंबाडी,काळसुरी,मेंदडी,गोंडघर,खरसई,बनोटी,वारळ, पाष्टी,मांदाटने,पाणंदरे,चिखलप,देवघर,ढोरजे,नेवरूळ,घुम,ठाकरोली,सकलप,पाभरे,कांदळवाडा, निगडी आणि तालुक्यातील इतर भागात जास्त प्रमाणात पाणथळ शेती असल्याने या भागातील शेतकऱयांना जास्त फटका बसल्याची शक्यता आहे.काळसुरीच्या सरपंच अरुणा नाक्ती यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱयांना योग्य तेवढी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

फोटो--म्हसळा तालुक्यातील काळसुरी,वारळ भागात शेतीत साचलेल्या पाण्यावर तरंगणारे भात शेतीचे पीक

अवश्य वाचा