मुंबई, दि. २५ 

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून विचारणा झाल्यास काँग्रेस त्याविषयी नक्कीच विचार करेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. आम्हाला शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास आम्ही दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू. त्यानंतर काही पर्याय निघतो का, ते पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जनतेने आपला कौल दिला आहे. कालच्या निकालातून जनतेने भाजपचा सत्तेचा अहंकार उतरवला आहे. भाजपच्या नेत्यांना जनतेने जमिनीवर आणल्याने त्यांना आता विरोधकही दिसतील. भाजपने सत्ता, पैसा आणि यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करायला लावले. पण, जनतेने या सर्व आयाराम गयारामांचा पराभव करून भाजपच्या सत्तेच्या मग्रुरीला चाप लावला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नका. ऊत मात करू नका हा संदेश जनतेने या निकालातून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस– ४४, राष्ट्रवादी काँग्रेस– ५४, बहुजन विकास आघाडी– ३, समाजवादी पक्ष– २, शेतकरी कामगार पक्ष– १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष– १, स्वाभिमानी शेतकरी संघटना– १, रवि राणा- १ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष- १० असे महाआघाडीचे ११७ उमेदवार निवडून आले. विरोधी पक्ष पूर्वीपेक्षा ताकदवान झाला आहे, असेही थोरात म्हणाले.

आगामी काळात राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढू. आमच्या १९ जागा १०००० पेक्षा कमी मताने हरल्या. नागपूर शहर काँग्रेसच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहिले. आम्ही तेथे दोन जागा जिंकलो आणि २ जागा आम्ही अवघ्या ५ हजार मताने हरलो. मुंबईसह शहरी भागात अपेक्षित यश मिळाले नाही. तिथे आम्ही जास्त प्रयत्न करू. संघटन मजबूत करू. पाच वर्षांत नवी काँग्रेस उभी करू, असेही ते म्हणाले.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'