खांब-रोहे, दि.२५

    गेली आठ-दहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतीचे पंचनामे करून शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशाप्रकारची म्हणून मागणी शेतकरीवर्गा कडून केली जाऊ लागली आहे. 

      भातशेती तयार होऊन ऐन कापणी, बांधणी व झोडणी च्या हंगामातच परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. तयार झालेली भात पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरीवर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.सततचा धो धो बरसत असलेला पाऊस यामुळे भातशेती आडवी झाल्याने भाताची कणसे चिखलाने माखली गेली तर काही ठिकाणी पाण्यावर तरंगल्याने रोपे खराब झाली आहेत. अशा परिस्थितीत भाताला भावच मिळत नसल्याने शेतकरी वर्गाच्या अडचणी वाढल्या आहेत.ऐन दिवाळी  सणाच्या तोंडावरच परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान केले असल्याने शेतकरी वर्गाला आपली दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे. 

          निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकरीवर्गाला बसत असल्याने शेती करावी की नाही याच कचाट्यात शेतकरी वर्ग सापडला आहे.चालू वर्षांचे हंगामात देखील परतीच्या पावसाने केलेले नुकसान पाहता शेतकरी वर्गाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शासनाने लवकरच नुकसानग्रस्त शेती क्षेत्राचे पंचनामे करून शेतकरीवर्गाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशाप्रकारची सध्या जोर धरू लागली आहे.

अवश्य वाचा