कोर्लई,ता.२३

     गेली तीन चार दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे बोर्ली-मांडला, नांदगाव, मजगांव परीसरातील शेकडो एकर जमिनी वरील ऐन तोंडाशी आलेली उभी पिके आडवी केली तर काही ठिकाणी कापलेले हळवे भातपिक पाण्यात भिजल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

      तीन दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे मुरुड तालुक्यातील बारशीव,भोईघर,काजूवाडी, बेलवाडी,मांडला,म्हाळुंगे(खुर्द),काकळघर,सुरई,चिचघर ,मजगांव, वांद्रे,वावे,वेळास्ते,उसरोली, पोफळी  भागात कापणी करून शेतात ठेवलेले भाताची कडपे पाण्यात तरंगत होती.काही ठिकाणी तर भाताच्या कणसाला(लोंंब्या)कोंब यायला सुरुवात झाली होती.ब-याच ठिकाणी शेतात उभे असलेले गरवा भातपीक तयार झालेली असून पडत असलेल्या पावसामुळे ऐन तोंडाशी आलेली भातपिके आडवी झाल्याने व कापलेली हळवी भातपीक शेतात पाण्यात भिजल्यामुळे नुकसान होऊन शेतकरी पुरता हैराण झाला आहे.त्यातच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज दिला असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नुकसानीचा खरा अंदाज येणार आहे.परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी कामात अधिकारी वर्ग असल्याने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू होण्यात अवधी लागेल असे बोलले जाते आहे.

 

अवश्य वाचा