पोलादपूर 

तालुका कृषी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी विधानसभा निवडणुककामी व्यस्त असताना तालुक्यातील भातपिकावरील किड नियंत्रणाकडे सपशेल दूर्लक्ष होऊन सुमारे 50ते 75 टक्के शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक लष्करी आळी आणि तुडतुडयांकडून फस्त झाल्याचे धक्कादायक सत्य प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामीण भागाचा दौरा करून केलेल्या पाहणीदरम्यान उघडकीस आणले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरील विविध जबाबदाऱ्या आणि प्रशिक्षणासाठी तालुका कृषी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी निवडणुक विभागाने पाचारण केल्याने व्यस्त राहिले असल्याने तालुका कृषी कार्यालयामार्फत यंदा भातपिक संरक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले नाही. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषीमंडळ अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या सर्वांनाच निवडणुकीसाठी नियुक्तया देण्यात आल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती व्यवसाय रामभरोसे ठेवण्यात आला.

काही गावांमध्ये शेतकऱ्यांना शेताच्या खाचरातील जादा असलेले पाणी काढून टाकावे, क्विनॉलफॉस 25 इसी हे 40 मिली. किंवा ट्रायझोफॉस 40 इसी 13 मिली. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन 5 इसी 5 मिली. ही किटकनाशके प्रति 10 लिटर्स पाण्यातून फवारावी असे उपाय सुचवून तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक निवडणूककामी व्यग्र झाले. मात्र, पावसाने यावर्षी उच्चांक प्रस्थापित करीत आजतागायत विश्रांती न घेतल्याने फवारलेली किटकनाशके पिकांवरून वाहून गेली आणि भातपिकांवर मोठया प्रमाणात लष्करी आळी आणि तुडतुडयांचा प्रादूर्भाव होऊन भाताच्या लोंब्या आलेल्या भातपिकाला फस्त केले आहे. अनेक ठिकाणी खाचरात ऑक्टोबर हिटच्या टळटळीत उन्हामध्ये वाळण्यासाठी टाकलेल्या पिकावर पाऊस पडून उन्हामुळे भात शिजल्याचा घमघमाट पसरलेला असून हे भातपीकही वाया जाणार असल्याने शेतकरीराजा चिंतेत दिसून आहे.

पोलादपुर तालुक्यातील देवळे, करंजे गावांमध्ये सुमारे शंभर ते दिडशे एकर झालेल्या भातशेतीला गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून निस्तेज असं पिवळं आणि करपल्यासारखं रुप आले असून करपा रोग आल्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांना किटकनाशक फवारणीचा उपाय सुचविण्यात आला. मात्र, फवारणीनंतरही पावसाने संततधार धरल्याने शेतकरी हतबल होऊन किडयांचा प्रबळ प्रादूर्भाव होत भातपिक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पोलादपूर तालुक्यामध्ये दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत सर्वाधिक 5800मी.मी. पावसाची नोंद झाल्याने सरकारने या भातपिकाची नुकसानभरपाई देण्यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

याप्रश्नी प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांच्याकडे संपर्क साधला असता तालुक्यातील तब्बल 75 टक्के भातशेती ऑक्टोबर हिटच्या टळटळीत उन्हामध्ये पडणाऱ्या सततच्या पावसामुळे कुजून गेली असून अनेक ठिकाणी करपा, सुरवंटाच्या आकाराच्या लष्करी आळी आणि तुडतुडयांचा प्रादूर्भाव होऊन भाताच्या रोपांचीही हानी झाली असल्याचे मान्य करून पोलादपूर तहसिल कार्यालयातील महसुली पंचनामे आणि तालुका कृषी कार्यालयाकडून पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतील, अशी माहिती देत तालुक्यात केवळ 25 ते 30 शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा लाभ घेतल्याने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यंदा पीकहानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे सांगितले.

कोकणातील शेतकरीराजाची घामाची मेहनत ही पावसावरील जुगार ठरल्याचे सलग दुसऱ्यावर्षी तालुक्यात पाहण्यास मिळत असून आता शेतकऱ्यांच्या भातपिकाला लवकरात लवकर हमीभाव देण्यासंदर्भात तातडीने महसुली पंचनामे होण्याची गरज असूनही अद्याप विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकामी कृषी कार्यालय आणि तहसिल कार्यालयाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने पंचनाम्याची कामे रखडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

अवश्य वाचा