पाली-बेणसे 

  ऑक्टोबर हिट च्या मोसमात व  ऐंन कापणीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या  पावसाने शेतकर्‍याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भातशेती कापणीच्या अंतिम टप्प्यात असल्याने परतीच्या पावसाने भातशेतीचा घात केला आहे. येथील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून वर्षभर शेतकर्‍याच्या कुटुंबाचे पोट शेतीतून निघणार्‍या उत्पादनावरच अवलंबून असते. मात्र अतिवृष्टीने व परतीच्या  पावसाने उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी येथील शेतकर्‍यांच्या हातोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर व व्याकुळ झाला आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याने शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. रायगड जिल्हा शेतकरी संघटनेची पालीत नुकतीच बैठक पार पडली असून  नुकसानग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून याबाबत निवेदन देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हरीचंद्र शिंदे, गणपत दळवी यांनी दिली. यंदा पावसाने बर्‍यापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पिक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरुही झाले होते. यंदा भाताला बाजारात चांगला भाव मिळेल या आशेवर आसलेल्या शेतकर्‍याचा आता हिरमोड झाला आहे. परतीच्या पावसाने शेतकर्‍यावर आस्मानी संकट ओढवल्याची परिस्तीती निर्माण झाली आहे. पाली सुधागडसह बेणसे, शिहू, झोतीरपाडा, चोळे गांधे, सांबरी, बेणसेवाडी, कुहिरे, तरशेत, जांभुळटेप व अन्य भागातील शेती परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठेनुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकर्‍यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली, आणि शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले. यंदा पावसाने मोठ्याप्रमाणावर नुकसान केल्याने सुरवातीपासून आजतागायत झालेला किमान खर्च तरी निघेल का? की दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार या भितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी आता खुप मोठ्या नैसर्गीक संकटात सापडला आहे. सातत्याने नैसर्गीक आपत्तीचा शिकार होत असलेल्या शेतकर्‍याला मायबाप सरकारने आधार देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत आहे. अशातच लाखोंचा पोशिंदा असलेला बळीराजा जर डोळ्यात आसू घेवून जगत असेल व सरकारकडून देखील त्याची उपेक्षा होत असेल कृषीव्यवसाय येत्या काळात धोक्यात येईल, अन्नधान्याची आयात परवडणारी नसेल परिणामी भावी पिढ्यांना मात्र भुकबळीला सामोरे जावे लागेल असे मत कृषीतज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,