चिपळूण 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने चिपळूण नं. १ शाळा आणि चिपळूण कन्याशाळा या शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहिली ते सातवीच्या पन्नास विद्यार्थ्यांना एक-एक पुस्तक भेट देण्यात आले.

  कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. चिपळूण नं. १च्या मुख्याध्यपिका सौ. वीणा गोगटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वाचन प्रेरणा दिनासाठी चिपळूण नं. १ आणि चिपळूण कन्या या शाळांची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘लोटिस्मा’चे संचालक मधुसूदन केतकर यांनी वाचनाचे महत्व सांगून प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जडणघडणीत वाचनाचे काय महत्व असते याचा आढावा घेतला. भारत घुले यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या ‘अग्नीपंख’ या आत्मचरित्राचा संदर्भ घेत वाचनामुळे अब्दूल कलाम नावाचा एक सामान्य कुटूंबातून आलेला मुलगा देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत कशी वाटचाल करू शकला ? याचे विवेचन केले. चिपळूण कन्याच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना साळुंखे यांनी ‘लोटिस्मा’च्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी मुलांना वाचनालयाची माहिती दिली. ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष अरूण इंगवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘लोटिस्मा’च्या बालवाचक पुरस्कार आणि चांगल्या बालवाचकाला वाचनालयाकडून एक पुस्तक वर्षाखेरीस भेट देण्यात येते, असे सांगितले. मुलांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले. चिपळूण शहरातील शाळांमध्ये दर महिन्याला ५० पुस्तकांचा संच वाचनालयाकडून वितरीत करण्यात येर्इल. दर महिन्याला तो बदलून देण्यात येर्इल शिक्षकांनी फक्त विद्यार्थ्यांना ती पुस्तके वितरीत करावीत. ही योजना निशुल्क असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  दोनही शाळांमधील ५० विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. निसर्गमित्र समीर कोवळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घायाळकर, वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी भौसले, शाळेचे शिक्षक आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सौ. प्रेरणा जाधव यांनी उपस्थितांचे आणि लोटिस्माचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक आणि कवी श्री. संदेश सावंत यांनी केले.

अवश्य वाचा