बेळगाव,दि.२१

               बेळगावचे प्रसिद्ध बासमती भात रविवारी झालेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील आपल्या स्वाद आणि रुचिमुळे ख्याती मिळवलेल्या बासमती भाताचे उत्पादन यंदा घटणार असल्याचा अंदाज  प्रगतशील शेतकरी राजू मरवे यांनी व्यक्त केला.

                     त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करत असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.पावसाळ्यात पडला नसेल इतका ढगफुटी झाल्यासारखा पाऊस रविवारी पडल्यामुळे येळ्ळूर,धामणे,शहापूर शिवारातील भातशेती पाण्याखाली गेली.त्यामुळे तयार होत आलेल्या  भातपिका वरून आता पाणी वाहत आहे.एक दोन दिवसात पाणी पूर्ण ओसरले नाही तर भात पीक पूर्ण कुजून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर्ण भरून येत असलेले भात पीक आडवे झाले आहे.येळ्ळूर येथील अरवळी धरण देखील भरल्यामुळे ते पाणी पुन्हा येळ्ळूर,शहापूर,धामणे आणि आसपासच्या शिवारात शिरून नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.बेल्लारी नाल्याला येणारा पूर आणि मच्छे,हलगा बायपास रस्त्याचे सुरू असलेल्या कामामुळे शेतातील पिकांचे अधिक नुकसान होत आहे. सध्या पश्चिम भागात भुईमूग,बटाटा आणि रताळी पाण्याखाली गेली असून चारही बाजूने बळीराजा सध्या अडचणीत आला आहे.

अवश्य वाचा