अलिबाग दि.20, 

 भारतीय निर्वाचन आयोग, भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरीच ब्यूरो; गीत व नाटक विभाग - महाराष्ट्र व गोवा क्षेत्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड यांचे अंतर्गत १८८~ पनवेल विधानसभा मतदार संघात मतदार संघात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यात स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहाच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदान विषयक जनजागृती केली.

पनवेल तालुक्यात "विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहाच्या स्वयंसेवकांनी 'मतदार-आपली जबाबदारी' या पथनाट्यातून मतदार जनजागृती केली.

मतदानाचे महत्व, मतदान न करण्याचे दुष्परिणाम, भारतीय निर्वाचन आयोगातर्फे दिव्यांगांसाठी सुलभ मतदान, इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांद्वारे मतदात्याला त्याच्या मतदानाबाबत मिळणारी सुरक्षिततेची हमी आदी प्रभावीपणे हाताळण्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिक मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.  

 पनवेल विधानसभा मतदार संघातील मानसरोवर, कामोठे सेक्टर ३५, कामोठे पोलीस ठाणे, कोपरगाव, लिटिल वर्ड मॉल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर बस स्थानक, हिरचंदानीहायवे, कळंबोली भीमा कॉम्प्लेक्स नाका, कळंबोली बस स्थानक, देवीचापाडा, कानपोळी, पालेबुद्रुक अशा विविध ठिकाणी उत्कृष्टरित्या संपन्न झालेल्या पथनाट्य जनजागृती दौऱ्यात कलाकार म्हणून प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे,सुचिता साळवी, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, आदी कलाकारांनी आपला सहभाग दिला.

यावेळी या कार्यक्रमास इलेक्शन डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, स्वीप पथक प्रमुख एस.के.वायचळे,सहाय्यक शिक्षक मंगेश जाधव, अमोल नाणेकर, म.न.पा. लिपिक जयराम पादीर, विजय गावंडे, महेश भापकर यांसह अन्य मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'