दिघी 

श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक भागात हलक्या सरीने सुरु झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवस ढगाळ वातावरण कायम आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसामुळे उत्साहावर विरजण पडले आहे.

तालुक्यात मागील पावसाच्या आपत्तीने आधीच संकटात आलेला शेतकरी या नव्या आपत्तीने पुरता खचला आहे. त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे. बोर्लीपंचतन परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून हलक्या सरीने सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस ढगाळ वातावरणासह धुडगूस माजवला आहे. यावेळी समुद्रकिनारा परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर शिस्ते, वडवली, वेळास, दिवेआगर, खुजारे, मेंदडी  आदी परिसरात पाऊस झाला. शेखाडी येथे पावसामुळे एक वेळच्या मिळणाऱ्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कापणीसाठी उभा असलेल्या भातशेतीला आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

बोर्लीपंचतन जवळील  काही गावांमध्ये शुक्रवार सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, दुपारनंतर वातावरण निवळले असे समजताच शेती कापणीसाठी सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास आकाशात ढगांनी पुन्हा गर्दी केली आणि परतीच्या पावसाचा शिडकाव सुरु झाला. परिसरात संततधार सुरूच राहिल्याने भात पिके बाधित होण्याचा धोका वाढला आहे. या करिता नुकसान भरपाई मिळण्यासाठी येथील शेतकऱ्यांची मागणी होत असताना सबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नुकसान भरपाई मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला असल्याने सध्या शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाऊस नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांनवर आली आहे.

पाऊस सुरूच असल्याने कापणी केलेला भात शेतात पडून आहे. पाणी साचलेल्या शेतामधून सध्या भाताच्या लोंबी हलवल्यास खराब होण्याची भीती आम्हा शेतकऱ्यांना आहे. तीन दिवस सुरु असलेला पाऊस थांबला नाही तर वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे.

अवश्य वाचा