अलिबाग 

दैनंदिन अडचणी आपण सोडवत नाही तोपर्यंत नेता होता येत नाही, राजकारणात शब्दाला महत्व आहे. जे अंतर आहे ते या निमित्ताने जवळ येवू दुर करु. राष्ट्रवादी काँग्रेस एकदिलाने काम करीत असल्याने अलिबाग-मुरुड मतदारसंघात शेकापक्षाचे उमेदवार आ. पंडितशेठ पाटील यांचे मताधिक्य निश्‍चित वाढणार असल्याचा विश्‍वास शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पिंपळभाट येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप प्रधान, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, दत्ता ढवळे, माजी तालुकाध्यक्ष ॠषीकांत भगत, अशिष भट, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, सरपंच स्वाती पाटील, जगदिश घरत, राहूल प्रधान, वानखेडे, प्रविण राऊत, सुनील गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांशी संवाद साधताना इतक्या वर्षांच्या संघर्षामुळे एकत्र यायला वेळ गेला असला तरी आता आपण सर्वजण एकदिलाने काम करत आहोत. लोकसभेला सुनील तटकरे यांना खासदार करण्यासाठी शेकापक्षाने कसलीही अडचण येऊ न देता प्रामाणिकपणे काम केले. जातीयवादी शिवसेना भाजपाला सत्तेपासून दुर करण्याला आपला प्राधान्य आहे. जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा संघर्ष न ठेवता गैरसमज दुर करुन सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचे मत आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपस्थित असलेल्या दत्ता ढवळे, ॠषिकांत भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही 100 टक्के शेकापक्षासोबत असल्याची ग्वाही दिली. शेकापक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. पंडितशेठ पाटील यांना जास्तीत जासत मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'