अलिबाग 

अलिबागमधील व्यापार्‍यांच्या पाठीशी आजवर शेकापक्ष ठाम उभा आहे. कुठलाही दबाव न ठेवता, सक्ती न करता आमच्या सर्व मागण्या शेकापक्षाने आजवर पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे आम्ही देखील आमचे कर्तव्य पार पाडत शेकापक्षाचे उमेदवार आ. पंडितशेठ पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करणार असल्याची ग्वाही व्यापारी संघटनेने दिली.

शहरातील महाजन हॉलमध्ये शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यापारी संघटनेसोबत शुक्रवारी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या वतीने सचिव शैलेश शाह यांनी प्रतिनिधीक मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या वतीने शेकापच्याच पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दर्शविला. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, गटनेते तथा शेकापक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, माजी उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, शहरचिटणीस अशोक प्रधान, अ‍ॅड सचिन जोशी, नगरसेवक अनिल चोपडा आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले, अलिबागचे शेकापक्षाचे आमदार अ‍ॅड दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील आणि आता पंडित पाटील हे असले तरी त्यांची आमदारकी खर्‍या अर्थाने मीच चालवली आहे. त्या माध्यमातून जितका विकास करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे. मते प्रेमाने , प्रामाणिकपणे आणि कामांच्या जोरावर तसेच संसदीय कामगिरीमुळे मिळत असतात. मतदार चौकस असतात ते विचार करुनच योग्य उमेदवाराला आपले मत देत असतात. रेवदंड्यातील व्यापारी अनेक वर्षे शेकापक्षाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. अलिबागच्या व्यापार्‍यांबरोबर देखील 20 वर्षांहून अधिक काळ एक नाते तयार केले आहे. हे करत असताना कधीच मतांची सक्ती केली नाही. आम्हाला ज्यांनी मत दिले त्यांना आम्ही कधीच विसरलो नाही. उद्याच्या निवडणूकीत देखील आपले हे जोडलेले नाते असेच अतुट ठेवा असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.

त्यावर व्यापारी संघटनेच्या वतीने बोलताना सचिव शैलेश शाह यांनी आपल्या मनोगतात सर्वांच्या वतीने शब्द देताना तुम्ही मधी मागितली नसलीत तरी आमची मते तुम्हालाच देणार असल्याचे सांगितले. तुम्ही कधीच मतांची सक्ती न करता आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आहात. आता आम्हीपण आमचे कर्तव्य पार पडणार असल्याची ग्वाही दिली. जैन समाजाच्या कत्तलखाना विरोधी आंदोलनाला शेकापक्षाने दिलेला सक्रीय पाठिंबा आम्ही कधीच विसरणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'