चिपळूण 

लो. टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार नामवंत पुरातत्व संशोधक डॉ. वसंतराव शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे.

पुरातत्व संशोधनात जागतिक कीर्ती मिळविलेल्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे, डॉ. वसंतराव शिंदे हे माजी कुलगुरू आहेत. चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावी जन्मलेल्या डॉ. शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण खेड तालुक्यातील खोपी या गावी झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून त्यांनी भारतीय इतिहास‚ संस्कृती व पुरातत्व या विषयात एम्.ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अर्लि सेटलमेंट इन सेंट्रल तापी बेसीन’ या विषयावर प्रबंध लेखन करून त्यांनी पी.एचडी. पदवी संपादन केली. पुढे केंब्रिज विद्यापीठ व डेन्मार्कमध्ये राष्ट्रीय संग्रहालयात संशोधन करून डॉ. शिंदे यांनी डी.लिट्. पदवी प्राप्त केली. त्यांनी नऊ संशोधनात्मक पुस्तके लिहिली आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांत त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. शिंदे यांचे विशेष संशोधन म्हणजे गुजरात आणि हरियाना मधील सिंधु संस्कॄतीचा शोध, नुकताच हरियाणातील राखीगढ येथे झालेल्या उत्खननात मिळालेल्या अवशेषांमधून आर्य हे भारताबाहेरून आले होते या विधानाला छेद देऊन आर्य हे स्थानिक होते. हे सिद्ध करण्यात  डॉ. वसंतराव शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी यासाठी घेतलेले परिश्रम आणि संशोधनातील सातत्य यामुळेच हे महत्वाचे संशोधन सप्रमाण सिद्ध झाले.

यंदाचा पुरस्कार इतिहास संशोधनासाठी देण्याचे नक्की झाल्यावर डॉ. शिंदे यांच्या अलौकिक कार्याची अभिमान पूर्वक दखल घेऊन लो.टि.स्मा.च्या निवड समितीने ‘अपरान्त भूषण’ पुरस्कारासाठी एकमताने त्यांची निवड केली आहे. पंचवीस हजार रूपये‚ सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुढील महिन्यात, रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान सोहोळा संपन्न होणार आहे. डॉ. वसंतराव शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारण्यास मान्यता दिली, याचा लोटिस्माला अभिमान वाटतो. अशा शब्दात वाचनालयाचे अध्यक्ष अरूण इंगवले व कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यानी आनंद व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा