चिपळूण 

जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव,  त्याचप्रमाणे वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कॅन्सरतज्ज्ञ तसेच तपासणीसाठी सोयीसुविधांचा अभाव यामुळे महिलांमधील स्ततनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. ग्लोबोकन २०१८ च्या अहवालानुसार स्तनाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून जगभरात २.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात, स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार आहे, ज्यामध्ये दर १ लाख  महिलांपैकी १२.७ टक्के महिलांचा मृत्यु होतो आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, स्तन कर्करोगाचा सामना करण्यासाठी वेळोवेळी निदान आणि वेळेवर उपचार करणे तसेच त्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत स्तन कर्करोगाचा भारतीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. पाश्चात्य देशांमध्ये कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे रजोनिवृत्ती आणि त्या दरम्यान घेतलेल्या हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे आहे. भारतात सॅच्युरेटेड फॅटी फुड्स,जंक फूड, उशीराने होणारे लग्न, बाळाला स्तनपान न देणे आणि व्यायामाचा अभाव या कारणास्तव होतात. स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि यशस्वी उपचारांसाठी डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासणी आणि मॅमोग्राफी तसेच सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

चिपळूण येथील ऑन्को लाइफ  केअर कॅन्सर सेंटरचे केमोथेरेपीतज्ञ डॉ. दत्तात्रय अंदुरे(मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) म्हणाले, स्तनाच्या कर्करोग हा  ४० ते ६० वर्षे वयोगटात पहायला मिळतो. परंतु आता मात्र तरुण मुलींनाही याचा कर्करोगाचा धोका वाढला आहे. दरमहिन्याला सर्वच महिलांनी किमान १० मिनीटे वेळ स्वतःसाठी राखुन ठेवत पाळीच्या सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. आपल्या स्तनाचे स्वत: परीक्षण करण्याचे काही मार्ग आहेत. ते म्हणजे आंघोळ करताना गोलाकार पध्दतीने आपला डावा हात आपल्या उजव्या स्तनावर फिरवा. आपण आपले संपूर्ण स्तन आणि बगलेचे परिक्षण केले पाहिजे. एखादी गाठ आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी सपर्क साधा. स्तनाची आत्मपरीक्षण करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आरशासमोर उभे राहून स्तनातील गुठळ्या, सूज येणे, त्वचेचे निस्तेज होणे आणि स्तनाग्र बदलणे यासारख्या बदलांचे परीक्षण करणे. यामुळे स्तनाचा कर्करोग ओळखला जाऊ शकतो तसेच केमाथेरपी तसेच शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतो. रोजच्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून ताज्या पालेभाज्या, फळं, पौष्टीक आहाराचा रोजच्या जीवनात समावेश करा.

 

अवश्य वाचा