चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘काव्यशब्दशिल्प’चा अनावरण सोहोळा काल (रविवारी) सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उद्योजक सुरेशदादा बेहेरे, सदानंद भागवत, प्रकाश देशपांडे उपस्थित होते. धामणी-संगमेश्वरचे नामवंत वक्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावरील व्याख्यानाने उपस्थितांची कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळ संस्मरणीय झाली.

 

या कार्यक्रमाला सावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सहभाग होता. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. परिघाबाहेरचे कार्यक्रम कोणी करत नाही म्हणून आपण करायचे अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रमांमागील भूमिका मांडली. वाचनालयाने सावरकरांच्या 'माझे मृत्युपत्र' कवितेतील, की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे । या पंक्तींचे शब्दशिल्प बनवून ते वाचनालयाच्या प्रवेद्वारापाशी लावले आहे. चिपळूणच्या जुन्या पद्मा थिएटर परिसरातील सावरकरांचे भाषण, सभा, स्वागत आणि सत्कार याची आठवणही इंगवले यांनी सांगितली. ज्यांच्या हस्ते काव्यशब्दशिल्पचे अनावरण झाले त्या उन्मेश शिंदे यांचे आजोबा आजोबा हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि भागोजीशेठ कीर यांचे वर्गमित्र होते. त्यांनी तत्कालिन आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बेहेरे यांनी सन १९५६ साली सावरकर आपल्या घरी आल्याची आठवण सांगताना तेव्हाचा फोटोही जपून ठेवल्याचे सांगितले.

 

श्रीनिवास पेंडसे ‘समाजसुधारक सावरकर’ या विषयावर बोलताना म्हणाले, इतिहासात अनेक घटना घडतात. मात्र  इतिहासासकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य अंधारमय होतं. त्यांनी सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’चा दाखला यावेळी दिला. भेदनीती, वर्णव्यवस्था यामुळे भारत अनेकदा पारतंत्र्यात गेला. सन १९०२ साली वयाच्या १९ व्या वर्षी सावरकरांनी ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ कविता लिहिली. सन १९२४ नंतर ते समाजसुधारणेकडे वळले असले तरी त्यांचा लढा तत्पूर्वीपासूनच सुरु होता. टिळक आणि आगरकर यांच्या विचारांचा अपूर्वसंगम म्हणजे सावरकर होत. सावरकरांनी अनुभव आणि अनुभूती घेऊन लेखन केलं. एकजिनसी स्वातंत्र्य हवं हे त्यांनी मांडलं. शुद्धीकरण चळवळ पहिल्यांदा त्यांनी अंदमानात राबविली. तिथून सुटल्यावर रत्नागिरीनजीकच्या शिरगावला सन १९२४ साली पहिल्यांदा हळदीकुंकू कार्यक्रम केला. सन १९२५ पूर्वस्पृश्य नंतर मिश्रहिंदू मेळावा त्यांनी घेतला. सन १९२७ ला झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला ७/८शे महिलांचा सहभाग होता. रत्नागिरीतील शाळांमध्ये सर्व समाज एकत्र शिकू शकेल अशी व्यवस्था तयार व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी पेंडसे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. सन १९२५ ते १९२८ साली रत्नागिरीत २०० शाळा होत्या. त्यातल्या १२० शाळा अशा तयार केल्या गेल्या जिथे सर्व समाज एकत्र शिकेल. या प्रयत्नांना सन १९३५ ला संपूर्ण यश मिळालं. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून सन १९३१ ला भंगी समाजातील शिव नावाच्या व्यक्तीने केलेल्या कीर्तनाची दखल टाईम्स ऑफ इंडियाने घेतली होती. सावरकर दसऱ्याला रत्नागिरीच्या मुस्लिम वस्तीत सोने वाटत असतं. एकदा रत्नागिरी ते मालवण समुद्र प्रवासात त्यांनी मुस्लिम नावड्यासोबत एक थाळीत भोजन केलं होतं. अशा अनेक उदाहरणातून त्यांनी आपला विषय नेहमीच्या शैलीत उपस्थित श्रोत्यांसमोर मांडला. विचार आणि कार्य या पातळीवर तुकडे पाडून सावरकर वेगळे मांडता येणार नाहीत, असेही ते शेवटी म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. अंजली बर्वे यांनी तर आभार मधुसूदन केतकर यांनी मानले.

अवश्य वाचा