चिपळूण 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने काल (शनिवारी) वाचनालयाच्या उषाताई साठे सभागृहात ‘नमनेश्वर साहित्य दर्शन’ हा टेरव-चिपळूणचे प्रथितयश कवी, लेखक अॅड. यशवंत बाबुराव कदम यांच्या साहित्याचा परिचय करून देणारा साहित्यिक-सांगितिक कार्यक्रम संपन्न झाला. गेल्या ४५ वर्षांच्या साहित्यिक प्रवासात संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज लेखकांची सावली आपल्या लिखाणावर पडल्याचे सांगून तीच ‘प्रतिसावली’ झाल्याचे कदम यांनी म्हटले. या कार्यक्रमाने उपस्थित साहित्य रसिकांची चांगलीच वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कवी माधवांच्या साहित्याचा चिकित्सात्मक अभ्यास करून ‘कविता माधवांची - एक मूल्यमापन’ हा संदर्भ ग्रंथ लिहिणाऱ्या कोमसाप चिपळूणच्या अध्यक्षा डॉ. सौ. रेखा देशपांडे यांनी करून दिला. पुस्तकाचे वाचक वगळता कवी कदम यांच्या साहित्याची फारशी माहिती नसलेल्या पिढीला अशा कार्यक्रमांद्वारे लेखकांची माहिती होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी म्हटले. ‘नामवंत कवी’, बोलीभाषांचे अभ्यासक आणि वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी नमनेश्वर यांची मुलाखत घेतली. मुलाखतकर्त्यांनी कदम यांना ‘कोकणातील साहित्य विश्व आणि कोमसाप’ या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे कदम यांच्याकडून ऐकताना उपस्थितांना साहित्य विश्वातील अनेक जुने संदर्भ नव्याने समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचा पूर्वार्ध या मुलाखतीने संस्मरणीय झाला. संपर्कात आलेल्या अनेक मोठ्या लेखकांची सावली आपल्या लिखाणावर पडल्याचे सांगून ही सावलीच प्रतिसावली झाल्याचे लेखकाने नमूद केले.

‘बुडणारे समाजतारू विनाशातून वाचवा हा कळकळीचा संदेश देणारी ही कविता आहे’ अशा शब्दात मंगेश पाडगावकरांनी गौरव केलेल्या लेखकाच्या ‘अंतरंग’ मधील काव्यरचना, पर्यावरण कामासाठी सांगलीचा ‘अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ प्राप्त, ‘गिरसा... बामणोलीचा मानबिंदू’ नियतकालिकाचे संपादक बुद्धघोष गमरे, केंद्रशासनाच्या सेन्ट्रल रेफरन्स लायब्ररी कलकत्ता मध्ये अधिकृत संदर्भ ग्रंथ म्हणून नोंद झालेल्या ‘पेटला कडबा’चे लेखक चंद्रकांत राठोड यांनी सादर केल्या. ‘गडगीचा डोह’ या कथासंग्रहातील दोन कथांचे सादरीकरण झाले. यातल्या कथा लेखकाचा बालवयातील निरागसपणा सांगणाऱ्या आहेत. म.सा.प. सदस्या प्राची जोशी यांनी अंतरीचा ओलावा ही कथा ग्रामीण जीवनातील बैलासारख्या जनावराबद्दल असलेली आपुलकी, प्रेम, स्नेह, प्रसंगी येणारी हृदयद्रावकता व्यक्त करणारी कथा सादर केली. ‘बोलविता धनी...’ पांडुरंगाला मानून स्वतःकडे ‘न्यूनत्व’ घेणारा या शीर्षक काव्यसंग्रहातील कविता, जंगल भ्रमंतीत रमणारे ग्रामीण कथाकार, कवी आणि लेखक रविंद्र गुरव आणि प्रतिबिंब कोकण मासिकाचे संपादक कैसर देसाई यांनी सादर केल्या. उत्श्रुंखल स्वभावामुळे कौटुंबिक नातेसंबंधात निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत दाखविणारी ‘पाझर’ ही कथा प्रसिद्ध योगशिक्षिका मनीषा दामले यांनी सादर केली. यानंतरच्या गीतगायन सत्रात, पहाडी आवाजाची देणगी लाभलेले शाहीर, नामवंत कवी, को.म.सा.प. चिपळूणचे  उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, उत्तम गायक अशी समाजमान्यता लाभलेले विजय कदम आणि शिवाजी शिंदे यांनी नमनेश्वर यांच्या विविध गेय पद्यरचना सादर केल्या. उपस्थितांना श्रवणानंदासोबतच कोजागिरीच्या पूर्वसंध्येला एक आगळी-वेगळी जुगलबंदी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकर्ते धीरज वाटेकर यांनी कदम यांचा परिचय करून देताना, ‘साक्षात दैवत पांडुरंग, सद्गुरू स्वामी महाराज, दत्त महाराज, सद्गुरू वासुदेव स्वामी दळवी महाराज, देवदत्त महाराज, स्वतःचे आजोबा सद्गुरू अनंतराव महाराज यांच्या आशीर्वादाने भागवत सांप्रदायाची पताका खांद्यावर घेत ते लिहिते झालेल्या कदम यांची १८ पुस्तके प्रकाशित आहेत. ‘तुम्ही मनात जे गुणगुणता ते कागदावर उतरवा, आपल्या मनातली कविता आपोआप जन्माला येईल.’ या वि. वा. शिरवाडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते लिहिते झाल्याचे म्हटले. कोमसापने कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्या प्रवाहातील यशवंत कदम हे एक प्रमुख ठळक नाव. स्वतः कदम आणि मधू मंगेश कर्णिक एकदा सद्गुरू देवदत्त महाराजांच्या दर्शनाला गेले होते. त्या भेटीत महाराज म्हणाले, ‘तुमच्या पाळण्यातल्या नावाने तुमचे व्हायचे तेवढे कल्याण होणार नाही. मी तुमचे नाव बदलतो. आजपासून तुम्ही नमनेश्वर नावाने लिहा. पुस्तकांवरही हेच लिहा.’ तेव्हापासून नमनेश्वर नाव रूढ झाल्याचे सांगितले. संगीतकार यशवंत देव यांनी त्यांना कवितेखाली ‘नमनेश्वर’ अशीच सही करायला सुचविल्याची माहिती त्यांनी दिली.

गायकांच्या सादरीकरणाला तबला साथ देणारे दिलीप सकपाळ, हार्मोनियम साथ देणाऱ्या सौ. मंदा सकपाळ यांच्यासह उपस्थितांचे आभार म.सा.प. चिपळूण शाखेचे सदस्य महंमद झारे यांनी मानले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रा. अंजली बर्वे, प्रा. संतोष गोणबरे, कवी नमनेश्वर कुटुंबीय आणि साहित्यरसिक यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा